दाऊदच्या डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:56 PM2018-03-23T23:56:05+5:302018-03-23T23:56:05+5:30
भारतातील अनेक हल्ल्यांच्या प्रकरणी हवा असलेला डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानस्थित डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे आहे, असा दावा जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीतील सेचार स्कूल आॅफ पॉलिसीमधील प्रोफेसर डॉ. लुईस शेली यांनी केला आहे.
वॉशिंग्टन : भारतातील अनेक हल्ल्यांच्या प्रकरणी हवा असलेला डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानस्थित डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे आहे, असा दावा जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीतील सेचार स्कूल आॅफ पॉलिसीमधील प्रोफेसर डॉ. लुईस शेली यांनी केला आहे. अमेरिकी संसद सदस्यांना त्यांनी सांगितले की, डी कंपनीने ड्रग्जच्या तस्करीसाठी अनेक देशांत पाय पसरत एका शक्तिशाली संघटनेचे रूप घेतले आहे.
शस्त्रास्त्रे, बनावट डीव्हीडीची तस्करी डी कंपनी करते. हवालाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करतात. दाऊद सध्या कराचीत असल्याचा दावाही भारत, अमेरिकेकडून करण्यात येत आहे. पाक मात्र हे दावे फेटाळत आलेला आहे. दाऊदविरुद्धची भारताची मोहीम योग्य असल्याचे अमेरिकेने २००३ मध्ये मान्य केले होते. त्यावेळी अमेरिकेने दाऊदला जागतिक अतिरेकी घोषित केले होते. त्याचे अल-कायदाशी संबंध असून संयुक्त राष्ट्रानेही त्याच्यावर प्रतिबंध आणले आहेत. पाकने दाऊदला आश्रय दिल्याचा भारताचा दावा मान्य करत त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, दाऊद कराचीत आहे व त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे.
सध्या मुक्काम एका बेटावर दाऊ दने कराचीजवळच्या एका बेटावरही आलिशान बंगला बांधला आहे. तो सध्या तिथे राहतो, असे वृत्त आठवड्यापूर्वी एका वृत्तवाहिनीने दिले होते. तिथे पाकचे पोलीस तैनात असल्याचा उल्लेख त्या वृत्तात होता.