World Nurse Day: कोण होत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल; जाणून घ्या त्यांचं आरोग्य क्षेत्रातलं मोलाचं कार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:59 AM2020-05-12T11:59:03+5:302020-05-12T11:59:18+5:30

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी वैद्यकीय सेवेचा चेहरामोहरा बदलला

this day is celebrated as World Nurse Day for honor of the first nurse florence nightingale kkg | World Nurse Day: कोण होत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल; जाणून घ्या त्यांचं आरोग्य क्षेत्रातलं मोलाचं कार्य

World Nurse Day: कोण होत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल; जाणून घ्या त्यांचं आरोग्य क्षेत्रातलं मोलाचं कार्य

googlenewsNext

मुंबई: आधुनिक नर्सिंगची सुरुवात करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा आज २०० वा जन्मदिन आहे. त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. गणित आणि सांख्यिकीच्या बाबतीत त्या अतिशय हुशार होत्या. याचा वापर त्यांनी रुग्णालयं आणि तिथे दाखल झालेल्या रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी केला. फ्लोरेन्स यांना सुरुवातीपासूनच परिचारिका होण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांची ही इच्छा आई वडिलांकडे बोलून दाखवली. मात्र त्यांनी विरोध केला. मात्र फ्लोरेन्स यांच्या इच्छेपुढे त्यांनी माघार घेतली.

१८२० मध्ये इटलीत जन्मलेल्या फ्लोरेन्स प्रशिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. १८५३ मध्ये क्रीमिया युद्धादरम्यान त्यांना तुर्कस्थानातील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं. ब्रिटननं महिलांना त्यांच्या सैन्यात सामील करुन घेतल्याची ही पहिलीच घटना होती. फ्लोरेन्स पहिल्यांदाच लष्कराच्या रुग्णालयात पोहोचल्या, तेव्हा तिथे त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली. त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण रुग्णालय स्वच्छ केलं. सैन्यासाठी चांगल्या कपड्यांची आणि जेवणाची व्यवस्था केली.

फ्लोरेन्स यांच्यामुळे पहिल्यांदाच सैन्याकडे, त्यांच्या गरजांकडे अतिशय लक्षपूर्वकरित्या पाहिलं गेलं. फ्लोरेन्स यांच्या मागणीनंतर एक समिती स्थापन झाली. तुर्कस्तानात १८ हजार सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी १६ हजार सैनिक अस्वच्छता आणि संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यूमुखी पडल्याचं समितीच्या अभ्यासातून समोर आलं. फ्लोरेन्स यांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय, स्वच्छता विज्ञान, सांख्यिकी विभागांची स्थापना झाली. याच विभागांमुळे रुग्णालयांमधल्या स्वच्छतेला महत्त्व आलं.

फ्लोरेन्स रात्रपाळीत हाती कंदील घेऊन काम करायच्या. त्यामुळे त्यांना लेडी विथ द लॅम्प म्हटलं जाऊ लागलं. त्यांच्या सन्मानार्थ आजही परिचारिका रुग्णसेवेची शपथ घेताना हातात मेणबत्ती घेतात. या शपथेला नाइटिंगेल शपथ म्हटलं जातं. १८६० मध्ये त्यांच्या नावानं ब्रिटनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना झाली. १९१० मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'ऑर्डर ऑफ मेरिट सन्मान' मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 

Web Title: this day is celebrated as World Nurse Day for honor of the first nurse florence nightingale kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.