प्रत्येक मिनिटाला सापडत आहेत मृतदेह! तुर्कस्तानात ३,४०० तर सीरियात १६०० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:55 AM2023-02-08T07:55:11+5:302023-02-08T08:00:11+5:30
खराब हवामान आणि महागाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या तुर्कस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
अंकारा/दमास्कस : तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले. त्यातही तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वाधिक फटका बसला. या दोन देशांना सध्या स्मशानकळा प्राप्त झाली आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असताना प्रत्येक मिनिटाला मृतदेह सापडत असल्याने हाडे गोठवणाऱ्या थंडीतही बचावकर्त्यांना घाम फुटत आहे. तुर्की-सीरिया भूकंपात सुमारे २० हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
खराब हवामान आणि महागाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या तुर्कस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे. येथे मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, गृहयुद्धाने ग्रासलेल्या सीरियामध्ये भूकंपाची भीषणता अद्याप उघड झालेली नाही.
लोकांना वाचवताना मित्राचा मृत्यू
गझियानटेप येथे राहणारा इर्डिम आणि त्याचे कुटुंब या भूकंपातून कसेतरी वाचले. घर सोडल्यानंतर काही क्षणांतच त्यांचे दुमजली घर पत्त्याच्या घरासारखे कोसळले. काही पाळीव प्राण्यांचा मात्र शोध लागला नाही. काल रात्रीच मी माझा जिवलग मित्र श्यादला घरी जेवायला बोलावले होते. भूकंपानंतर श्याद ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धावला. तिथे पोहोचल्यावर घराचा शेवटचा उरलेला भाग त्याच्या अंगावर पडला आणि सगळे संपले.
इतरांना वाचवायला गेले, स्वत:चे कुटुंब संपले -
तुर्कीतील अजमरिन येथे राहणाऱ्या फरहादचा अनुभव हृदय पिळवटून टाकणारा आहे. फरहाद म्हणतो, सोमवारी पहाटे चार वाजता भूकंप झाल्याचे लक्षात येताच आरडाओरडा करून घरातील उर्वरित पाचजणांना जागे केले. सगळे बाहेर धावले. म्हातारे आई- वडील वेळेवर बाहेर निघू शकले नाहीत. गॅरेजचा मोठा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. काही तासांनंतर त्यांचे मृतदेह सापडले.
दरम्यान, पत्नी आणि मुलगा रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी दुसरा धक्का बसला आणि जवळची एक इमारत काही सेकंदात कोसळली आणि मग माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही संपले. आता कुठे जाणार? कोणासाठी जगणार? हेच समजत नाही.
मृतदेह बाहेर काढता काढता काळीज दगडाचे झाले...
सीरियाच्या नागरी संरक्षणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, याला काय म्हणावे ते मला कळत नाही. मृतदेह बाहेर काढताना आपण थकलो आहोत. दर मिनिटाला कोणत्या ना कोणत्या ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढला जात आहे. सत्य हे आहे की, अशी आपत्ती हाताळण्याची क्षमता आपल्यात नाही. मृतदेह बाहेर काढता काढता काळीज दगडाचे झाले आहे.
‘इंटरसेक्टिंग फॉल्ट’मुळे भूकंप
हा भूकंप ‘इंटरसेक्टिंग फॉल्ट’मुळे झाल्याचे दिसते. जेव्हा एक भूगर्भाचा स्तर (टेक्टोनिक प्लेट) दुसऱ्यावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. या विध्वंसात ३,४५० हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या. यापैकी बऱ्याच आधुनिक इमारती होत्या, ज्या संरचनेच्या ‘पॅनकेक मॉडेल’च्या आधारे बांधल्या गेल्या होत्या; परंतु, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर हे मॉडेल अपयशी ठरले, असे केगली यांचे मत आहे. अनेक इमारती पुरेशा भूकंपीय मजबुतीकरणाशिवाय काँक्रीटच्या बांधलेल्या होत्या.
‘पॅनकेक मॉडेल’ उद्ध्वस्त
- मेलबर्न : तुर्कीमध्ये एकापाठोपाठ तीन मोठे भूकंप होऊन त्यात पाच हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, हजारो लोक जखमी झाले आहेत आणि अनेक अजूनही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
- या पार्श्वभूमीवर तेथील इमारतींच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
- मेलबर्न विद्यापीठातील भूकंप-शास्त्राचे सहायक प्राध्यापक मार्क केगली यांच्या मते तेथील ‘पॅनकेक मॉडेल‘ भूकंपाने उद्ध्वस्त केले.