इंडोनेशियात व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं 6 किलो प्लास्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:25 PM2018-11-21T15:25:04+5:302018-11-21T15:29:14+5:30
वाकटोबी नॅशनल पार्कमध्ये सापडला मृतदेह
जकार्ता: प्लास्टिकचा अतिवापर आणि त्याचे निसर्गावर होणारे परिणाम किती भीषण आहेत, याची प्रचिती वारंवार येताना दिसतेय. इंडोनेशियात एका व्हेल माशाचा मृत्यू झालाय. या माशाच्या पोटात तब्बल 6 किलो प्लास्टिक आढळून आलंय. वाकटोबी नॅशनल पार्कमधील कापोटा बेटाजवळ हा मासा मृतावस्थेत आढळून आलाय.
मृत व्हेलच्या पोटात नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आलंय. यामध्ये प्लास्टिकच्या 25 पिशव्या, 4 पाण्याच्या बाटल्या, सँडल, प्लास्टिकच्या 115 कप्सचा समावेश आहे. याशिवाय माशाच्या पोटात एक गोणीदेखील आढळून आलीय. त्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक तारा आहेत. या माशाचा मृत्यू प्लास्टिक खाल्ल्यामुळे झाला का, याची खात्रीशीर माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या व्हेल माशाच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे.
याआधी जून महिन्यात थायलंडमध्ये एक व्हेल मासा मृतावस्थेत आढळला होता. त्या माशाच्या पोटातून जवळपास 17 पौंड (6 किलो) प्लास्टिक आढळून आलं होतं. त्या माशाच्या पोटात 80 हून अधिक प्लास्टिक पिशव्या होत्या. जगातील बहुतांश देश मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात. यातील 50 टक्के कचरा चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या पाच देशांकडून टाकला जातो. याला आळा न घातल्यास येत्या दशकभरात समुद्रातील प्लास्टिकचं प्रमाण तिपटीनं वाढेल आणि सागरी जीवन मोठ्या संकटात सापडेल.