इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यात अम्पायरचा मृत्यू
By admin | Published: November 30, 2014 12:53 PM2014-11-30T12:53:56+5:302014-11-30T12:56:41+5:30
ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अशदोद (इस्त्रायल) दि. ३० - उसळता चेंडू डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इस्त्रायलमधील अशदोद येथे सध्या साखळी सामने सुरु असून या सामन्यात हिलेल अवास्केर (वय ५८) हे अम्पायर होते. अवास्केर बॉलिंग एंडला उभे होते. या दरम्यान एका वेगवान चेंडूवर फलंदाजाने फटका मारला. मात्र हा चेंडू सरळ जाऊन स्टम्पवर लागला व तिथून उडून तो जोरात अवास्केर यांच्या छातीवर लागला. यामुळे अवास्केर मैदानातच कोसळले व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीवर चेंडू लागल्यावर अवास्केर यांना ह्रदयविकाराचा झटका आला व यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती अवास्केर यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली.
अवास्केर हे इस्त्रायलच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इस्त्रायल संघ त्यांच्याच नेतृत्वाखाली खेळला होता. इस्त्रायलमधील स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक २४४ धावा करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.