जगातील सर्वात वयस्कर 146 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
By Admin | Published: May 2, 2017 10:32 AM2017-05-02T10:32:44+5:302017-05-02T10:32:44+5:30
इंडोनेशियात राहणारे बहा गोथो यांचा 1870 रोजी जन्म झाला होता
>ऑनलाइन लोकमत
जकारता, दि. 2 - जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 146 वर्षीय या व्यक्तीने आपण जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचा दावा केला होता. बहा गोथो असं त्यांचं नाव असून ते इंडोनेशियात राहत होते. कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार 1870 रोजी गोथो यांचा जन्म झाला होता. त्यांना गेल्याच महिन्यात रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. त्यांना नेमकं काय झालं होतं ते कळू शकलं नाही. सहा दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी आल्यानंतर ते फक्त ओट्स खात होते. स्थानिक लोक त्यांना सोदिमेदजो नावाने ओळखत असतं. गोथो यांना सिगारेटचं व्यसन होतं.
एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, "रुगालयातून घरी परतल्यानंतर त्यांचा आहार खूपच कमी झाला होता. फक्त काही चमचे ओट्स खात होते. पाणीदेखील खूप कमी पीत होते". गोथो यांच्या वयासंबंधी शंकादेखील आहे. कारण इंडोनेशियात 1900 च्या आधी जन्मनोंदणीला सुरुवात झालेली नव्हती. गोथो केंद्रीय जावा येथील सरागेन शहरात राहत होते.
गतवर्षी स्थानिक नोंदणी कार्यालयाने त्यांच्या वयाची माहिती खरी असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी गोथो यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितलं होतं की, "1992 मध्येच आपण आपल्या मृत्यूची तयारी सुरु केली होती". आपल्या कबरेवर ठेवण्यात येणारा दगडही त्यांनी तयार करुन घेतला होता. गोथो यांनी तेव्हा म्हटलं होतं की, "आता मला जगण्याची इच्छा नाही". गोथो यांच्यासमोर 10 भाऊ - बहिण, चार बायका आणि मुलं सर्वाचा मृत्यू झाला होता.
गोथो यांनी मृत्यूनंतर दफन करण्यासाठी जमीन विकत घेतली होती. सोमवारी निधन झाल्यानंतर त्याच जमिनीत त्यांना दफन करण्यात आलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार सर्वात जास्त वर्ष जगण्याचा रेकॉर्ड फ्रान्स 122 वर्षीय महिलेच्या नावे आहे. 1997 मध्ये त्या महिलेचं निधन झालं. जर गोथो यांचा दावा खरा ठरला तर हा रेकॉर्ड त्यांच्या नावे होईल.