वायू प्रदूषणाने दरवर्षी लाखोंचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2016 03:29 AM2016-02-14T03:29:50+5:302016-02-14T03:29:50+5:30
वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका
वॉशिंग्टन : वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे.
सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या भारत आणि चीन या देशातील वायू सर्वात जास्त प्रदूषित आहे. चीनमध्ये कोळसा जाळण्यात आल्याने त्यातून निघणाऱ्या कणामुळे जास्त प्रदूषण होते. या देशात वायू प्रदूषणाने दरवर्षी ३,६०,००० मृत्यू होतात.
भारत, चीन, अमेरिका आणि कॅनडा येथील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर दी अॅडव्हान्समेंट आॅफ सायन्समध्ये (एएएएस) आपले संशोधन सादर केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांमुळे भारतात १४ लाख तर चीनमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला.
युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटीश कोलंबियाचे संशोधक मायकेल ब्राऊर म्हणाले की, जगभरात वायू प्रदूषण हे मृत्यूचे चौथे मोठे कारण आहे. पर्यावरणाकडून निर्माण झालेला धोका हे आजारपणासाठी कारणीभूत आहेत. केवळ उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आणि धूम्रपान यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र वायू प्रदूषणाच्या तुलनेत जास्त आहे. पत्रकार परिषदेत नवीन संशोधनाची माहिती देताना ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या ‘सुरक्षित स्तरा’पेक्षा जगात घनदाट ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भागात जास्त वायू प्रदूषण आहे. (वृत्तसंस्था)
या संशोधनात १९९० ते २०१३ दरम्यान १८८ देशात आरोग्य आणि वायू प्रदूषणसारख्या धोकादायक कारणांचे विश्लेषण करण्यात आले. ब्राऊर म्हणाले की, आशियात मोठी लोकसंख्या असणारे देश असून येथेच जास्त प्रदूषण आहे. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानातील परिस्थिती पाहता या देशात वायू प्रदूषण उत्तरोत्तर वाढत आहे. चीनमधील परिस्थिती स्थिर असली तरीही तेथील वायू प्रदूषण प्रचंड आहे. त्याचबरोबर या देशातील लोक वृद्ध होत चालले आहेत. लोकांचे वय वाढत चालले आहे. प्रदूषणामुये या देशात हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, कर्करोगासारख्या गंभीर आजाराची व्याप्ती वाढत आहे.