पाकला एफ-१६ विमाने देण्याचा निर्णय; भारताकडून तीव्र नाराजी
By Admin | Published: February 14, 2016 03:39 AM2016-02-14T03:39:28+5:302016-02-14T03:39:28+5:30
ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची आठ एफ-१६ लढाऊ विमाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या प्रस्तावाला रिपब्लिकन सदस्यांचे प्राबल्य असलेल्या काँग्रेसमध्ये
वॉशिंग्टन : ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची आठ एफ-१६ लढाऊ विमाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या प्रस्तावाला रिपब्लिकन सदस्यांचे प्राबल्य असलेल्या काँग्रेसमध्ये मोठा विरोध होऊ शकतो. ही विमाने अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. त्यामुळे भारतात या व्यवहाराबाबत संताप निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांना शनिवारी पाचारण करून याबाबतची नाराजी जाहीर केली.
पाकला विमाने देण्याचा ओबामा प्रशासनाचा प्रस्ताव आता काँग्रेसकडे येईल व काँग्रेसला त्याबाबत ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. आक्षेप घेतला गेल्यास ही प्रक्रिया प्रदीर्घ अणि गुंतागुंतीची होईल, कारण त्यामुळे प्रस्तावित व्यवहारावर चर्चा आणि मतदान घ्यावे लागेल. सामान्यपणे अशी स्थिती येत नाही. कारण, शस्त्रांच्या मोठ्या व्यवहारांत काँग्रेसचे नेते आणि प्रशासन सहमतीसाठी एकजुटीने काम करतात. सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीअंतर्गत असलेल्या एशिया आणि प्रशांत उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस सदस्य मॅट सैल्मन यांनी १० फेब्रुवारीच्या पत्रात अध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिले होते की, पाकिस्तानी लष्करावर कथितरीत्या दहशतवादी कारवायांत गुंतल्याचे झालेले आरोप व भारतासोबत युद्ध भडकल्याच्या स्थितीत तोे या विमानांचा वापर अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी करण्याची शक्यता असल्याच्या दृष्टिकोनातून पाकच्या आक्रमक लष्करी क्षमतांना एवढे बळ देणे समस्या निर्माण करू शकते.
(वृत्तसंस्था)
दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला एफ-१६ विमानांबाबतच्या भारताच्या चिंतेबाबत विचारणा केली असता हा अधिकारी म्हणाला की, कोणत्याही शस्त्राच्या हस्तांतरणापूर्वी आम्ही प्रादेशिक सुरक्षेचा मुद्दा विचारात घेतो.
अमेरिकी राजदूतांना पाचारण करून कळविली नाराजी
1) परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अमेरिकी राजदूत रिचर्ड वर्मा यांना साऊथ ब्लॉकमध्ये बोलावले होते. यावेळी त्यांना अमेरिकेकडून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या लष्करी मदतीबद्दल भारताला वाटत असलेल्या चिंतेची जाणीव करून देण्यात आली. या लष्करी मदतीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो,असे भारताचे म्हणणे आहे.
2)परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा अमेरिकेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करणारे वक्तव्य जारी केले आहे. अशाप्रकारे शस्त्रास्त्र पुरवठ्याने दहशतवादाची समस्या हाताळण्यास मदत होईल, हा युिक्तवादही मंत्रालयाने फेटाळला आहे.
3) पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमान पुरवठ्याबाबत ओबामा प्रशासनाच्या निर्णयावरुन काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश पाकिस्तानचे सर्वात मोठे शस्त्रपुरवठादार बनणे ही त्यांच्या परराष्ट्र धोरणाची मोठी उपलब्धी असल्याची टीका केली.
संसद सदस्यांचा विरोध असूनही प्रस्ताव
रिपब्लिकन तसेच डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांच्या प्रभावी नेत्यांकडून विरोध होत असूनही परराष्ट्र मंत्रालयाने ‘एफ -१६’ विमाने पाकला देण्याच्या व्यवहारास मंजुरी दिल्याचे काँग्रेसला कळविले आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय म्हणते सर्वांचेच हित
या व्यवहारामुळे सुरक्षेची उद्दिष्टे साध्य करण्यासही हातभार लागणार आहे, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, पाकिस्तान दहशतवादविरोधी लढाईत गुंतला असल्याने त्यांच्यासाठी ही विमाने निर्णायक ठरणार आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला सिनेट सदस्य बॉब कोरकर यांनी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना पत्र पाठवून पाकला विमाने देण्याचा निर्णय घेऊ नये, असे कळविले होते.