भारतातील जलसाठ्यांमध्ये झालेली घट चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:20 AM2018-05-19T00:20:15+5:302018-05-19T00:20:15+5:30
शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याने भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे.
वॉशिंग्टन : शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याने भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे. मानवी कृतीमुळे ओढावलेल्या या स्थितीचा नासाने उपग्रहांद्वारे प्रथमच अभ्यास केला.
यासंदर्भात नासाच्या गोदार्द स्पेस फ्लाइट सेंटरने उपग्रहांची मदत घेऊन केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, उत्तर भारतामध्ये गहू व तांदळाच्या पिकासाठी पाण्याचा अतिवापर केला जातो. त्यामुळे त्या भागातील जलसाठ्यांच्या प्रमाणात खूप घट झाली आहे. अभ्यास झाला, त्या कालावधीत इथे पाऊसमान सामान्य होते. तरीही तिथे वापरता येण्याजोग्या पाण्याचा तुटवटा जाणवत होता. ही बाब निश्चितच गंभीर आहे.
हा लेख ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
अमेरिकेच्या नासाने व जर्मनीने उपग्रहामार्फत सुमारे १४ वर्षे संयुक्तरित्या राबविलेल्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपिरिअन्सेस या प्रकल्पातील निष्कर्षांचा तसेच अन्य विविध उपग्रहांनी नोंदविलेल्या निरीक्षणांचा नासाने या अभ्यासासाठी वापर केला आहे. (वृत्तसंस्था)
>बदलत्या प्रमाणास अनेक घटक कारणीभूत
नासाच्या जेट प्रॉप्युल्शन लॅबॉरेटरीतील शास्त्रज्ञ जय फमिग्लिट्टी यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर जलसाठ्यांच्या बदलत्या प्रमाणाला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यांचा अधिक सखोल अभ्यास करावा लागेल.