दुबईत ‘लोंबार्घिनी सुपर कार’मधून पाकिस्तानी आंब्याची डिलिव्हरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:21 AM2020-07-02T00:21:22+5:302020-07-02T07:03:21+5:30

पाकिस्तानी स्टोअर्सच्या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद; विक्रीत दुप्पट वाढ; ग्राहकाच्या परिवारास महागड्या कारची घडविली जाते सैर

Delivery of Pakistani Mango from 'Lombarghini Super Car' in Dubai! | दुबईत ‘लोंबार्घिनी सुपर कार’मधून पाकिस्तानी आंब्याची डिलिव्हरी!

दुबईत ‘लोंबार्घिनी सुपर कार’मधून पाकिस्तानी आंब्याची डिलिव्हरी!

Next

दुबई : एका पाकिस्तानी सुपर मार्केटने दुबईतपाकिस्तानी आंब्याच्या प्रसारासाठी ‘मँगोज इन लोंबार्घिनी’ नावाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पाकिस्तानी आंब्याची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे.

‘पाकिस्तान सुपर मार्केट दुबई’ या मॉलचे व्यवस्थापकीय संचालक झनझेब यासीन यांनी जूनच्या मध्यात हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात जगातील सर्वाधिक महागड्या गाड्यांपैकी एक असलेल्या लोंबार्घिणी सुपर कारमधून ग्राहकास घरपोच आंबे पाठविले जातात. त्यानंतर ग्राहकाच्या परिवारास या आलिशान गाडीमधून एक छोटीशी सैरही घडविली जाते. या उपक्रमासाठी जी लोंबार्घिणी सुपर कार वापरली जाते, तिची दुबईतील किंमत १.२ दशलक्ष दिरहम (संयुक्त अरब आमिरातीचे चलन) आहे. किमान १०० दिरहमची आॅर्डर देणाऱ्या ग्राहकास या सुपर कारमधून घरपोच डिलिव्हरी दिली जाते. या सुपर मार्केटकडून पाकिस्तानातील सुमारे अर्धा डझन लोकप्रिय जातीचे आंबे दुबईत विकले जातात.

यासीन यांनी दुबईच्या स्थानिक दैनिकांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या उपक्रमामागे व्यावसायिक हेतू नाही. आनंद आणि प्रेमाचा संदेश मी यातून देऊ इच्छितो. उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आमची आंबा विक्री जवळपास १०० टक्के वाढली आहे. एवढे बुकिंग झाले आहे की, आता ग्राहकांना डिलिव्हरीसाठी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमची नियमित व्हॅन डिलिव्हरीही सुरूच आहे; पण लोकांना सुपर कारमधूनच डिलिव्हरी हवी आहे. या निमित्ताने ग्राहकांच्या मुलांना सुपर कारची सैर करण्याची संधी मिळते. या उपक्रमाआधी आम्ही रोज ४० पेट्या आंबे विकायचो. आता ९५ पेट्या विकल्या जात आहेत.

यासीन यांनी सांगितले की, आमच्या आंब्याची मागणी रोज वाढत आहे. पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकांकडून योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा होतीच. तथापि, पाश्चात्त्य देशांतील नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. पाकिस्तानातील लंगडा, सिंधडी, अन्वर रत्तोल आणि चौसा या आंब्याच्या जाती पाश्चात्त्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. फिलिपिन्सचे नागरिक चौसाची मागणी करीत आहेत.

यासीन यांनी सांगितले की, आंब्याच्या डिलिव्हरीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आमची मागणी वाढली. सुरुवातीला आम्ही आठवड्यातून एकदा डिलिव्हरी द्यायचो. आता आम्ही आठवड्यातून तीनवेळा १२ आॅर्डर्सची डिलिव्हरी देतो. वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आता मी आठवड्यातील पाच दिवस डिलिव्हरी देण्याचे नियोजन करीत आहे.

भारत-पाकिस्तान यांची आंब्यातही स्पर्धा!
पाकिस्तानात आंब्याच्या २५० जाती आहेत. तसेच हा देश जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा आंबा उत्पादक आहे. भारत पहिल्या स्थानी असून, त्यानंतर चीन, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा क्रमांक लागतो. जागतिक बाजारात पाकिस्तानी आंब्याला भारतीय आंब्याशी स्पर्धा करावी लागते! विशेष म्हणजे चौसा, लंगडा, दशेरी यासारख्या काही जातींचे आंबे दोन्ही देशांत उत्पादित होतात. दोन्ही देशांतील या जातीच्या आंब्याच्या चवीतही फारसा फरक नाही. त्यामुळे स्पर्धा तीव्र आहे.

यंदा टोळधाडीचा मोठा फटका बसल्याने पाकिस्तानातील आंबा उत्पादन घसरले आहे. भारतातही टोळधाड आलेली आहेच. असे असले तरी संयुक्त अरब आमिरातीत आंब्याचे दर अजूनही परवडण्याजोगे आहेत. यासीन यांनी सांगितले की, या मोहिमेत आमच्याकडून आंबे घेणारे ग्राहक पुन्हा पुन्हा आंबे घेतात. अशा ग्राहकांची संख्या मोठी आहे. कारण ग्राहकांच्या मुलांना सुपर कारची सैर आवडते. आम्ही किमान १०० दिरहमचे आंबे खरेदीची अट ठेवली असली तरी अनेक ग्राहक एकाच वेळी विविध जातींच्या आठ पेट्यांपर्यंत खरेदी करतात.

अशी सुचली अनोख्या उपक्रमाची कल्पना

  • मँगोज इन लोंबार्घिणी उपक्रमाची कल्पना कशी सुचली या प्रश्नावर यासीन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे विमान वाहतूक कंपन्यांनी प्रवासी आसनांवर नाशवंत वस्तूंची वाहतूक सुरू केल्याचे माझ्या वाचनात आले.
  • ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला लोंबार्घिणीमधून घेऊन जाणे योग्य राहील, असे मला वाटले आणि उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद कल्पनातीत आहे. लोकांच्या चेहºयावर प्रेम आणि हास्य फुलविण्याचे काम मी करीत राहीन.
  • प्रवासी विमानात अशी वाहतूक होत असेल, तर आपण सुपर कारमधून आंब्याला प्रवास का घडवू नये, असा विचार माझ्या डोक्यात आला. फळांच्या राजाला खास राजेशी थाटाची वागणूक द्यायला हवी.

Web Title: Delivery of Pakistani Mango from 'Lombarghini Super Car' in Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.