लोकशाहीवादी आंदोलक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यांवर
By admin | Published: February 2, 2015 01:12 AM2015-02-02T01:12:18+5:302015-02-02T01:12:18+5:30
लोकशाहीवादी निदर्शक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शहरातील विविध भागांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करू नये
हाँगकाँग : लोकशाहीवादी निदर्शक पुन्हा हाँगकाँगच्या रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शहरातील विविध भागांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करू नये म्हणून २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मागच्या वर्षीही लोकशाहीवादी आंदोलकांनी भव्य रॅलीचे आयोजन करून महत्त्वाच्या ठिकाणी ठिय्या दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी येथील लोकशाहीवादी आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी हाँगकाँगमधील महत्त्वाचे रस्ते जवळपास अडीच महिने बंद होते. आंदोलक याच मागणीवर ठाम आहेत. जवळपास ३ हजार आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
रविवारची रॅली शांततापूर्वक असेल. तथापि, गेल्या वर्षाप्रमाणे ठिय्या आंदोलन केले जाणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. यावेळीही आंदोलक हाती पिवळ्या छत्र्या घेऊन या रॅलीत सहभागी झाले आहेत.
आम्हाला सर्वंकष मताधिकार हवा, असे रॅलीच्या संयोजकांपैकी एक असलेले डेसी चॅन यांनी सांगितले. २०१७ मध्ये हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला चीनने मंजुरी दिली आहे. तथापि, उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवला आहे. चीनच्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करून हाँगकाँगवासी लोकशाही मार्गाने ही निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत. (वृत्तसंस्था)