‘गुलामी’ रस्त्याविरुद्ध पाकव्याप्त काश्मिरच्या अनेक शहरांत निदर्शने
By admin | Published: May 16, 2017 01:45 AM2017-05-16T01:45:30+5:302017-05-16T01:45:30+5:30
व्यापार आणि आर्थिक सहकार्य या मार्गाने दक्षिण आशियात आपले प्राबल्य अधिक बळकट करण्यासाठी चीनने आखलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी
गिलगिट : व्यापार आणि आर्थिक सहकार्य या मार्गाने दक्षिण आशियात आपले प्राबल्य अधिक बळकट करण्यासाठी चीनने आखलेल्या ‘वन बेल्ट, वन रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर बीजिंगमध्ये पाकिस्तानसह २३ देशांची परिषद सुरु असतानाच याच योजनेचा एक भाग असलेला ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) जेथून जातो त्या पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्तिस्तानमध्ये चीनच्या या विस्तारवादाविरुद्ध निदर्शने सुरु झाली आहेत. गिलगिट-बाल्तिस्तान हा वादग्रस्त पाकव्याप्त काश्मीरचा भाग असल्याने सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करून भारताने बीजिंग परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
काराकोरम स्टुडन्ट््स आॅर्गनायजेशन, बलवारीस्तान नॅशनल स्टुडन्ट््स आॅर्गनायजेशन, गिलगिट बाल्तिस्तान युनायडेट मूव्हमेंट आणि बलवारीस्तान नॅशनल फ्रंट यासह अनेक विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी गिलगिट, हुन्झा, स्कार्डू आणि गिझेर या शहरांमध्ये निदर्शने केली.
‘सीपीईसी’ हा गिलगिट-बाल्तिस्तानच्या दृष्टीने गुलामीचा रस्ता आहे व ‘सीपीईसी’ आणि ‘ओबीओआर’ ही चीनचा गिलगिट बळकावण्याचा कुटील डाव आहे, असा या निदर्शकांचा आरोप आहे. ‘चीनची साम्राज्यशाही रोखा’, असे फलक हाती घेऊन निदर्शक रस्त्यांवर उतरले होते. गिलगिट हा सन १९४८-४९ पासून वादग्रस्त प्रदेश असल्याने या भूमीवरील चीनचे अतिक्रमण जागतिक समुदायाने रोखाने, असे आवाहन ते करीत होते. ‘सीपीईसी’च्या नावाखाली पाकच्या संगनमताने चीनने गिलगिटमध्ये बेकायदा घुसखोरी केली आहे. एकीकडे या निमित्ताने पाकिस्तानात चीनचे लष्करी अस्तित्व टिकवून ठेवणे व दुसरीकडे अमेरिकेला शह देणे, असा दुहेरी हेतू यामागे असल्याचा आरोप या निदर्शकांनी केला.