डेंग्यूमुळे जगाचे दरवर्षी ५९३ अब्ज रुपयांचे नुकसान!

By admin | Published: May 6, 2016 02:03 AM2016-05-06T02:03:43+5:302016-05-06T02:03:43+5:30

भारतासारख्या देशांत सार्वजनिक आरोग्याला डेंग्यूचा फार मोठा धोका असून, त्यामुळे जगाचे दरवर्षी ८.९ अब्ज अमेरिकन डॉलरचे (५९३ अब्ज रुपये) नुकसान होते. कॉलरा, रेबीज

Dengue causes loss of $ 593 billion every year! | डेंग्यूमुळे जगाचे दरवर्षी ५९३ अब्ज रुपयांचे नुकसान!

डेंग्यूमुळे जगाचे दरवर्षी ५९३ अब्ज रुपयांचे नुकसान!

Next

वॉशिंग्टन : भारतासारख्या देशांत सार्वजनिक आरोग्याला डेंग्यूचा फार मोठा धोका असून, त्यामुळे जगाचे दरवर्षी ८.९ अब्ज अमेरिकन डॉलरचे (५९३ अब्ज रुपये) नुकसान होते. कॉलरा, रेबीज आणि रोटाव्हायरस गॅस्ट्रोएंटेरिटिससारख्या अनेक मोठ्या संसर्गजन्य आजारांमुळे जेवढा बोजा पडतो, त्यापेक्षा हा बोजा जास्त आहे.
अमेरिकेतील बँ्रडीज युनिव्हर्सिटी येथील आरोग्य अर्थशास्त्रज्ञांच्या गटाने जगात डेंग्यूच्या तापाने १४१ देश आणि विभागांवर किती आर्थिक बोजा पडतो, याचा व्यापक अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला. हे देश आणि विभागांत प्रत्यक्ष डेंग्यूचा उपद्रव झालेला आहे. दरवर्षी त्यांना ८.९ अब्ज डॉलरचे नुकसान होते. कॉलरा, रोटाव्हायरस गॅस्ट्रोएंटेरिटिस, रेबीजसारख्या रोगांमुळेही एवढे नुकसान होत नाही, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक डोनाल्ड शेफर्डनी म्हटले.
डेंग्यू स्थानिक आरोग्य राखणारी व्यवस्था शब्दश: मोडून टाकतो व त्याच्याशी संबंधित वैद्यकीय खर्च वाढवतो व उत्पादन क्षमता घटवतो. तथापि, डेंग्यूचा ताप हा मोठ्या प्रमाणावर जीवघेणा आजार नाही, म्हणून मलेरियासारख्या पारंपरिक आजारात जी उपाययोजना केली जाते, तेवढे लक्ष डेंग्यूच्या तापाकडे जात नाही. भारत, मलेशिया, मेक्सिको आणि फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये डेंग्यूमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे, अशा एकेका देशावर डेंग्यूमुळे किती आर्थिक बोजा पडतो, याचे अनेक अभ्यास शेफर्ड आणि त्यांच्या तुकडीने प्रकाशित केले आहेत. जगात आर्थिक बोजा किती पडतो, हे निश्चित करण्यासाठी या अभ्यासाने सध्याचे सगळे पुरावे मिळविण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घेतली.
निष्कर्षांसाठी लोकसंख्येवर आधारित माहितीची टंचाई हे या अभ्यासात मोठे आव्हान होते. विशेषत: दक्षिण अशिया व अफ्रिकासारख्या उष्णकटिबंधातील भागात असा काही अभ्यासच अस्तित्वात नाही, असे शेफर्ड म्हणाले. या अभ्यासाने डेंग्यूचा खर्च जागतिक आणि विभागीय पातळीवर आणि कमी व प्रदीर्घ कालावधीसाठी किती येतो, याची माहिती पुरविली आहे. डेंग्यूला तोंड द्यायच्या कार्यक्रमात कोणते निर्णय घ्यायचे, याची माहिती व आकडेवारी सरकारांना आणि या कामासाठी देणगी देणाऱ्या देशांना उपयोगाची ठरेल. प्रत्येक देशात या आजाराला तोंड देण्यासाठी सार्वजनिक निधीला त्याच्या क्षमतेपेक्षा मोठा भार उचलावा लागतो, असे शेफर्ड म्हणाले.

डेंग्यू हा डासांपासून खूप वेगाने पसरणारा आजार असून, सध्या जगाच्या निम्म्या लोकसंख्येला (जवळपास चार अब्ज लोक) त्यापासून धोका आहे. या शिवाय, दरवर्षी ६० ते १०० दशलक्ष लोकांमध्ये
त्या आजाराची लक्षणे आढळतात.
उष्णकटिबंधातील आणि उप उष्णकटिबंधातील देशांमध्ये डेंग्यूला ‘ब्रेकबोन फिव्हर’ या टोपणनावाने ओळखले जाते. या आजारामुळे जो भयंकर त्रास होतो त्यावरून हे नाव पडले आहे. डेंग्यू चार प्रकारच्या विषाणूंमुळे पसरतो. डेंग्यू त्याच व्यक्तीवर चार वेळा हल्ला करू शकतो. ब्राझील, भारत आणि इंडोनेशियासारखे देश डेंग्यूचा स्रोत असून, त्याच्या तापाचा फटका या देशांतील नागरी भागांना मोठ्या प्रमाणावर बसतो.

Web Title: Dengue causes loss of $ 593 billion every year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.