Desmond Tutu Cremation: इको फ्रेंडली अंत्यसंस्कार; डेसमंड टुटू यांच्या मृतदेहाला अग्नीऐवजी पाण्याने जाळले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 07:30 PM2022-01-02T19:30:47+5:302022-01-02T20:53:06+5:30
दक्षिण आफ्रिकेत अनेक दशकांपासून वर्णद्वेषाच्या धोरणाविरोधात लढा देणारे आर्कबिशप डेसमंड टुटू यांचा 26 डिसेंबर 2021 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर ‘एक्वामेशन’ पद्धतीने अंत्य संस्कार केले जाणार आहेत. या प्रक्रियेत मृतदेहाला अग्नीऐवजी पाणी आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडने जाळले जाते.
दक्षिण आफ्रिकेत अनेक दशकांपासून वर्णद्वेषाच्या धोरणाविरोधात लढा देणारे आर्कबिशप डेसमंड टुटू (Desmond Tutu) यांचा 26 डिसेंबर 2021 रोजी वयाच्या 90व्या वर्षी मृत्यू झाला. काही दिवस त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवल्यानंतर आता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात आता झाली आहे. टुटू यांनी आपला अंत्यविधी पारंपारिक पद्धतीने न करता पर्यावरणपूरक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानुसार, त्यांच्या मृतदेहाचे ‘एक्वामेशन’ केले जाणार आहे. या प्रक्रियेत मृतदेहाला अग्नीऐवजी पाण्याने जाळले जाते.
एक्वामेशन म्हणजे काय?
एक्वामेशन किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस ही आग वापरुन मृतदेह जाळण्याच्या पारंपारिक पद्धतीपेक्षा खूप वेगळी आहे. या प्रक्रियेमध्ये मृत व्यक्तीचे शरीर उच्च दाबाच्या धातूच्या सिलेंडरमध्ये पाणी आणि क्षारीय घटक (पोटॅशियम हायड्रॉक्साईड) च्या द्रावणात ठेवले जाते आणि सिलेंडर सुमारे तीन ते चार तास 150 डिग्री सेल्सियस तापमानाला गरम केले जाते.
या प्रक्रियेत शरीर पूर्णपणे द्रव बनते आणि कंटेनरमध्ये फक्त हाडे उरतात. हाडे गरम ओव्हनमध्ये वाळवली जातात आणि नंतर त्यांची पावडर बनवून कलशात ठेवली जाते आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिली जाते. विशेष बाब म्हणजे एक्वामेशनचे हे तंत्र काही देशांमध्येच वैध आहे. दक्षिण आफ्रिकेत या प्रथेबाबत सध्या कोणताही कायदा नाही.
एक्वामेशनचा प्राण्यांवर वापर?
एक्वामेशनची प्रक्रिया 1990 च्या दशकात विकसित झाली. सुरुवातीला याचा उपयोग प्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी केला जात असे. 21 व्या शतकाच्या सुरूवातीस ही पद्धत अमेरिकन वैद्यकीय शाळांमध्ये देखील स्वीकारली गेली. नंतर, मानवी मृतदेहांच्या अंतिम संस्कारांमध्ये देखील एक्वामेशनचा वापर केला गेला.
वर्णभेदाचा विरोध, शिक्षण आणि समान हक्कांसाठी लढा
नोबेल शांतता पारितोषिक विजेते दक्षिण आफ्रिकेचे माजी आर्कबिशप डेसमंड टुटू यांचे रविवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. दक्षिण आफ्रिकेत ते वर्णभेद विरोधी प्रतीक म्हणून ओळखले जातात. एवढेच नाही तर टुटू यांना देशाचा नैतिक होकायंत्र देखील म्हटले जाते. 1984 मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यानं 1986 मध्ये त्यांना केपटाऊनचे पहिले मुख्य बिशप बनवण्यात आले.
गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित
1990 मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारशी चर्चा केल्यानंतर आणि वर्णभेद कायदा रद्द केल्यानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. 1994 मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मंडेला यांनी टुटू यांना वर्णभेदाच्या काळात मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करणाऱ्या आयोगाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. 2007 मध्ये भारताने त्यांना गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित केले.