मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:53 AM2022-03-25T08:53:15+5:302022-03-25T08:54:56+5:30
हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती.
काबुल : अफगाणिस्तानचातालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती आणखी बिकट झाली आहे. त्या देशात बेकारीचे प्रमाण खूप वाढले असून, अन्नधान्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. उपासमार, गरिबी यांच्याशी झुंजणारे अफगाणी नागरिक आपल्या कच्च्याबच्च्यांची पोटे भरण्यासाठी स्वत:ची एक किडनी विकत आहेत.
त्या देशातील हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती. तिथे त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यातील काही माणसांची निवड होऊन त्यांची एक किडनी शस्त्रक्रियेद्वारे काढून घेण्यात आली. त्याचा त्यांना मोबदलाही देण्यात आला. त्या पैशातून त्या अफगाणी नागरिकांनी आपली मुले, कुटुंबाकरिता अन्नधान्य खरेदी केले. एक किडनी विकून आलेला पैसा फार काळ पुरणार नाही याची कल्पना असूनही जगण्याच्या संघर्षात अजून काही काळ तगून राहाण्यासाठी अफगाणिस्तानचे नागरिक हे टोकाचे पाऊल उचलत आहेत. हेरात प्रांतामध्ये किडनी विकण्याचे प्रमाण वाढले व आता हे लोण साऱ्या अफगाणिस्तानमध्ये पसरत आहे. (वृत्तसंस्था)
३.८ कोटी लोक उपासमारीच्या समस्येने ग्रस्त
अफगाणिस्तानवर तालिबानने सहा महिन्यांपूर्वी कब्जा केला. गेल्या वीस वर्षांपासून तो देश युद्धाच्या झळा सोसत होता.
त्यामुळे आधीच हालाखीच्या स्थितीत सध्या आणखी भर पडली आहे. त्या देशातील ३.८ कोटी लोक उपासमारीच्या समस्येने ग्रस्त आहे. गरिबीचे प्रमाणही खूप वाढलेले आहे.
किडनीचे रॅकेट आंतरराष्ट्रीय?
अफगाणिस्तानातील किडनी रॅकेट चालविणारे लोक गोरगरिबांना मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांची एक किडनी शस्त्रक्रियेद्वारे काढून घेतात.
ज्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, अशांना ही किडनी मोबदल्यापेक्षा तिप्पट-चौपट किमतीने विकली जाते.
या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या सामील असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.