बांगलादेशात हिंदूंची २० मंदिरे उद्ध्वस्त
By admin | Published: November 2, 2016 04:19 AM2016-11-02T04:19:05+5:302016-11-02T04:19:05+5:30
एका आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या बांगलादेशमधील रहिवाशांनी चितगाव येथील २0 हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली
ढाका : सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या बांगलादेशमधील रहिवाशांनी चितगाव येथील २0 हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली आणि १00 हून अधिक हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. ही घटना रविवारी घडली. फेसबूकवर इस्लामसंदर्भात उल्लेख केल्याचे आढळल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
मशिदीबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणी करत रविवारी हजारो लोकांनी मोर्चा काढला होता. मुस्लिमांची पवित्र स्थळे असलेल्या ठिकाणी हिंदू देवता दाखवल्यामुळे लोक संतापले होते, असे सांगण्यात येते. त्या मोर्चात सहभागी झालेल्या १५0 ते २00 परिसरातील ५ मंदिरांमधील ७ मूर्तींची तोडफोड केली, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अब्दुल करीम यांनी दिली. या तोडफोडीदरम्यान काही जण जखमी झाले असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक हिंदूंच्या मते मात्र हिंदूंच्या २0 मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. मोर्चातील लोकांनी अनेक मूर्तींची तोडफोड व विटंबना केली आणि हिंदूंच्या १00 हून अधिक घरांची तोडफोड केली आणि तेथील मौल्यवान वस्तू लुटल्या, अशी तक्रार आहे. मोर्चेकऱ्यांनी हिंदूंच्या घरांतील ऐवज लुटल्याचा आरोप नासीरनगर पूजा समितीचे महासचिव खैलपाद पोद्दार यांनी केला.
ढाक्यापासून १५0 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. ज्याने फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली, त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र पोस्ट टाकणारी व्यक्ती तीच असल्याचे स्पष्ट झालेले नाही. (वृत्तसंस्था)