आमच्या तीन बॉम्बनी जगाचा होईल विनाश- उत्तर कोरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 06:08 PM2017-04-24T18:08:53+5:302017-04-24T18:08:53+5:30
उत्तर कोरियाचे पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी उत्तर कोरियाला आव्हान देणा-या देशांना इशारा दिला
ऑनलाइन लोकमत
प्योंगयांग, दि. 24 - उत्तर कोरियाचे पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी उत्तर कोरियाला आव्हान देणा-या देशांना इशारा दिला आहे. आमच्याकडे असंख्य अणुबॉम्ब असून, त्यातल्या केवळ तीन अणुबॉम्बनी संपूर्ण जगाचा नायनाट होऊ शकतो," अशी धमकी उत्तर कोरियाच्या पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी दिली आहे.
ते म्हणाले, उत्तर कोरियाला कोणीही हात लावू शकत नाही. जर असं झाले तर लोक बंदुका आणि मिसाइलनं देशाची सुरक्षा करतील. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब आहेत. त्यातील तीन अणुबॉम्ब हे पूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इसिसच्या तळांवर अमेरिकेनं "मदर ऑफ ऑल बॉम्ब" टाकला होता. इसिसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी उत्तर कोरियाच्या युद्धविषयक अभ्यासाचीही माहिती दिली आहे.
"उत्तर कोरिया हा स्वप्नलोक आहे. उत्तर कोरियात लोकांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ते स्वतःचं जीवन अतिशय शांततेच्या मार्गानं जगत आहेत. त्याप्रमाणेच उत्तर कोरियात कोणत्याही प्रकारचा सामाजिक संघर्ष उद्भवत नाही. उत्तर कोरियात सर्व नागरिक एकमेकांच्या सहकार्यानं आपली कामं करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. तर कालच अमेरिकेची युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सनला एका हल्ल्यात नेस्तनाबूत करू, अशी धमकी उत्तर कोरियानं दिली आहे, असं वृत्त सत्ताधारी वर्कर पक्षाच्या मुखपत्रातून छापून आलं आहे. आमची सेना अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका समुद्रात डुबवण्यास सज्ज आहे, असा इशारा उत्तर कोरियानं अमेरिकेला दिला होता. त्यामुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.