जपानमध्ये पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळं स्वागत; स्टेट गेस्ट म्हणून विशेष मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:43 AM2023-08-21T10:43:13+5:302023-08-21T10:43:45+5:30
Devendra Fadnavis Japan Tour: जपान दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Devendra Fadnavis Japan Tour:जपान सरकारकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसजपान दौऱ्यावर पोहोचले आहेत. जपान येथे पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रप्रमुख किंवा त्याच्या समकक्षीय नेत्यालाच स्टेट गेस्ट म्हणून जपानचे सरकार आमंत्रण देते. २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जपानने स्टेट गेस्ट म्हणून बोलविले होते. यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा झाली होती. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यावेळी जपानच्या शाही महालात स्नेह भोजनाचे ही आयोजन केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले
जपान दौर्याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे माझे कुटुंबीय माझे औक्षण करतात अगदी तसेच स्वागत माझे जपानमध्ये झाले. भारतीयांनी गायलेले 'लाभले आम्हास भाग्य' या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. खरंच जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा एक गट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जपान दौऱ्यावर असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. सुनिटोमो, एनटीटी आणि सोनीसारख्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच विरार सी लिंक, ठाणे कोस्टल रोड आणि नागपुर-गोवा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी जपानकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या 'जेआसीए'च्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. जपान- इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील, असे सांगितले जात आहे.