Bangladesh : ढाक्यातील इमारतीत स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 07:00 PM2023-03-07T19:00:46+5:302023-03-07T19:02:13+5:30
Bangladesh : या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये अनेक सॅनिटरी उत्पादनांची दुकाने आहेत आणि बाजूच्या इमारतीत BRAC बँकेची शाखा आहे.
ढाका : बांगलादेशातील ढाका येथे एका इमारतीत स्फोट झाला. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलिस्तान भागातील एका बहुमजली इमारतीत हा स्फोट झाला. आज दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाला. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला ती सात मजली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर हा स्फोट झाला.
दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये अनेक सॅनिटरी उत्पादनांची दुकाने आहेत आणि बाजूच्या इमारतीत BRAC बँकेची शाखा आहे. या स्फोटामुळे बँकेच्या काचेच्या भिंतींचा चक्काचूर झाला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी 4 मार्च रोजी बांगलादेशातील चितगाव सीताकुंड उपजिल्हामधील कदम रसूल (केशबपूर) भागात ऑक्सिजन प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटात 30 हून अधिक लोक जखमी झाले. स्फोट इतका जोरात होता की ऑक्सिजन प्लांटपासून दोन किमी दूर असलेल्या इमारतींमध्येही स्फोटाचा आवाज ऐकू गेला.
या स्फोटात ऑक्सिजन प्लांटमध्येच पाच जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, ऑक्सिजन प्लांटपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुकानात बसलेले 65 वर्षीय शमशुल आलम यांचा धातूची वस्तू पडल्याने मृत्यू झाला होता. शमशुल आलम यांच्या भावाने सांगितले होते की, स्फोटानंतर सुमारे 250-300 किलो वजनाची वस्तू त्यांच्या अंगावर पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.