'ढाका'मधील बाजारला आग, ६ हजार दुकानं; अग्निशमनसह हेलिकॉप्टरनेही मारले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 04:07 PM2023-04-04T16:07:49+5:302023-04-04T16:32:06+5:30
ढाकामधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ढाका येथील ठोक बाजारात मंगळवारी आग लागली
बांग्लादेशची राजधानी ढाका येथील सर्वात ठोक बाजारात आग लागल्याची घटना घडली. बंगाबाजारमध्ये मंगळवारी लागेलल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे. परिसरातील ६ इमारती आणि इतरही भागात ही आग पसरली होती. या बंगा बाजारमध्ये ६ हजारांपेक्षा अधिक दुकाने आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यरत झाली होती.
ढाकामधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ढाका येथील ठोक बाजारात मंगळवारी आग लागली. त्यावेळी, तेथील ६ कपडा बाजारातील दुकानांनी पेट घेतला होता. आग नियंत्रित आणण्यासाठी ४७ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.
आगीने रौद्र रुप घेतल्यामुळे वायू सेनेच्या हेलिकॉप्टरलाही पाचारण करण्यात आलो होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहाटे ६.१५ वाजता ही आग लागल्याची माहिती फायर सर्व्हीसचे अधिकारी रफी अल फारुक यांनी दिली. या आगीच्या दुर्घटनेत अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत, मात्र कुठलिही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, आगीमुळे धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडचण येत होती, असेही फारुक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.