हुकूमशहा किम जोंग उन यांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य; दक्षिण कोरियाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:48 PM2024-01-05T17:48:51+5:302024-01-05T17:50:42+5:30
नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसली होती
Kim Jong Un daughter Kim Ju ae: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची धाकटी मुलगी त्यांची उत्तराधिकारी असू शकते अशी शक्यता दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने व्यक्त केली आहे. विशेषत: गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे त्यांची सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढली आहे, त्यामुळे या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. किम जोंगची धाकटी मुलगी, किम जू ए, ही सध्या केवळ १० वर्षांची आहे. ती नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकपणे दिसली होती जेव्हा तिने तिच्या वडिलांसोबत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र चाचणी पाहिली होती. तेव्हापासून, झू ए तिच्या वडिलांसोबत सतत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहे. कोरियन मीडिया सतत तिला किमचे सर्वात लाडके अपत्य म्हणत आहेत. कोरियन मीडियामध्ये तिची वाढती राजकीय प्रतिष्ठा आणि तिच्या वडिलांशी असलेली जवळीक सातत्याने हे सिद्ध करत आहे. तसे अनेक फोटो आणि व्हिडीओ फुटेजही दिसत आहेत.
किम जोंगची धाकटी मुलगी किम जू ए तिच्या वडिलांच्या जवळ आहे, हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा दिसून येते. सप्टेंबरमध्येच लष्करी परेडच्या वेळी व्हीआयपी स्टँडमध्ये ती सैन्याला प्रोत्साहन देत, टाळ्या वाजवताना दिसली. सैन्यातील एक जनरल गुडघ्यावर बसून तिच्या कानात काहीतरी कुजबुजतानाही दिसला. नोव्हेंबरमध्ये झू ए हिने वडिलांसोबत हवाई दलाच्या मुख्यालयालाही भेट दिली होती.
किम जोंग उन उत्तराधिकाऱ्याच्या शोधात
दक्षिण कोरियाची मुख्य गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिसने गुरुवारी सांगितले की किम जू ए तिच्या वडिलांची संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहे. तिच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे आणि तिला प्रदान केलेल्या प्रोटोकॉलमुळे ही शक्यता वाढली आहे. एनआयएस सार्वजनिक व्यवहार कार्यालयाने एपी वृत्तसंस्थेला सांगितले की, उत्तर कोरियाचा हुकूमशहा उत्तराधिकार प्रक्रियेसंदर्भात सर्व पर्यायांचा विचार करत आहे, जेणेकरुन वेळ आल्यावर त्यांना कोणताही त्रास होणार नाही.