खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 09:54 AM2020-12-07T09:54:59+5:302020-12-07T09:56:11+5:30

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Did Mount Everest fall in height? Unravel from Nepal on 8 th december 2020 | खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा

खरंच, माऊंट एव्हरेस्टची उंची घटलीय का? नेपाळकडून होणार उलगडा

Next
ठळक मुद्देनेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - जगातील सर्वात मोठं शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा सुरू असल्यानं नेपाळने या शिखराची उंची मोजण्याचं ठरवलं आहे. सन 2015 साली नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जगातील अनेक देशांना पडलेल्या या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम नेपाळने हाती घेतलं असून मंगळवारी यासंदर्भात उघडपणे माहिती देण्यात येईल. 

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेपाळने यासंदर्भात डेटा गोळा केला असून माऊंट एव्हरेस्टच्या सध्याच्या उंचीबाबत ते मंगळवारी अधिकृत घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नेपाळने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी डेटा कलेक्शनचं काम केलं आहे. नेपाळ सर्वेक्षण विभागाने जगभरातील मीडिया चॅनेल्स आणि पत्रकारांना आमंत्रण दिलं आहे. त्यामध्ये, माऊंट एव्हरेस्टसंदर्भातील उंचीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून या कामात स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सुशील नरसिंह राजभंडारी यांनी सांगितलं आहे. 

नेपाळ सरकारच्या मतानुसार 2015 साली झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्टसह इतरही डोंगर रांगांच्या उंचीमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे, जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1954 साली घेण्यात आलेल्या मोजमापानुसार माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848 मीटर एवढी आहे. त्यानंतर, 1975 मध्ये चीनी सर्वेक्षकांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी, समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 8,848.13 मीटर उंच सांगण्यात आली होती. नेपाळमध्ये सागरमाथा या नावाने माऊंट एव्हरेस्टला संबोधित करण्यात येते.    
 

Web Title: Did Mount Everest fall in height? Unravel from Nepal on 8 th december 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.