Pakistan Election मध्ये नवाझ शरीफ जिंकले की जिंकवलं?; एकूण मतांपेक्षा जास्त मते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:01 PM2024-02-09T18:01:00+5:302024-02-09T18:02:30+5:30
नवाझ शरीफ यांनी लाहोर मतदारसंघातून पीटीआय समर्थित उमेदवार यास्मिन रशीद यांचा १,७१,०२४ मतांनी पराभव केला आहे.
कराची - पाकिस्तानच्या निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. दिर्घकाळ हा निकाल लांबल्याने अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच लाहोरमधून नवाझ शरीफ यांना विजयी घोषित करण्यात आले असले तरी त्यांच्या विजयात हेराफेरीचे आरोप होत आहेत. नवाज यांच्या विजयावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत हे जाणून घेऊया.
पाकिस्तानच्या निवडणूक निकालाला सुरुवात झाल्यापासून त्यात हेराफेरी केल्याचा आरोप होत आहे. निवडणूक प्रचारात इमरान खान समर्थक उमेदवारांनी आरोप केला होता की, पाकिस्तानी लष्कर आमच्या सभा होऊ देत नाही. इतकेच नाही तर लष्कर उघडपणे नवाझ शरीफांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगचे समर्थन करत आहे. त्यामुळे लाहोर मतदारसंघातून नवाझ शरीफ यांचा विजयावर प्रश्नचिन्ह आहेत. शरीफ यांच्या विजयाची घोषणा करणाऱ्या फॉर्मवर १४ उमेदवारांना शून्य मतदान दाखवण्यात आलं आहे. तसेच जितके मतदान झाले त्याहून अधिक मतमोजणी दाखवली आहे.
नवाझ शरीफ यांनी लाहोर मतदारसंघातून पीटीआय समर्थित उमेदवार यास्मिन रशीद यांचा १,७१,०२४ मतांनी पराभव केला आहे. परंतु अंतिम घोषित यादीत लाहोर जागेवर लढणाऱ्या १८ पैकी १४ उमेदवारांना शून्य मते असल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्याबाबत विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. या उमेदवारांच्या कुटुंबीयांनीही मतदान केले नाही का? याशिवाय एकूण पडलेली मते २,९३,६९३ दाखवली गेली आहेत आणि वैध मतांच्या पुढे २,९४,०४३ मते दिसत आहेत. फॉर्म ४७ मधील या त्रुटीने नवाझ शरीफ आणि पाकिस्तान निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतमोजणी सुरू झाल्यापासून नवाझ शरीफ इमरान यांनी पाठिंबा दिलेल्या यास्मिन रशीदपेक्षा मागे पडले होते, मात्र अचानक शरीफ विजयी घोषित करण्यात आले आहे. आता फॉर्म ४७ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दुसऱ्या जागेवर नवाझ यांचा दारूण पराभव
या निवडणुकीत नवाझ शरीफ दोन जागांवरून निवडणूक लढवत होते. पाकिस्तानी मीडियानुसार, नवाझ शरीफ यांना NA-15 मानसेहरा जागेवर पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवार शहजादा गस्तासाप यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला आहे. पीटीआय नेते संपूर्ण पाकिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत, रिपोर्टनुसार सुमारे ७० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये PTI समर्थित (अपक्ष उमेदवार) - २४, PPP - २४, PMLN - १८, इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत. सध्या १९५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.