VIDEO- कुत्र्यासारखा भुंकणारा पोपट तुम्ही पाहिलात का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 07:32 AM2017-08-14T07:32:10+5:302017-08-14T07:32:19+5:30
पोपटाच्या विशिष्ट आवाज काढण्याच्या कलेमुळे तो जगभरातल्या पक्षीप्रेमींच्या पसंतीस उतरतो.
लंडन, दि. 14 - पोपटाच्या विशिष्ट आवाज काढण्याच्या कलेमुळे तो जगभरातल्या पक्षीप्रेमींच्या पसंतीस उतरतो. त्याच्या गोड गोड आवाज काढण्यानं सगळ्यांनाच तो आपलासा वाटतो. ब-याचदा लोक पोपटाला पिंज-यात बंदिस्त करून ठेवतात. मात्र आकाशात स्वच्छंदी विहारणार पोपट अनेकांना भावतो. घरातल्या प्रत्येकाला नावानं हाक मारण्याच्या त्याच्या शैलीमुळे तो कुटुंबातला एक सदस्यच होऊन जातो. नावानं हाक मारण्यासोबत पोपट ब-याचदा निरनिराळे आवाजही काढतो. शिट्या मारण्यासह आवाज काढण्यात पोपटाचा कोणीही हात धरू शकत नाही. माणसांची नावं घेताना तुम्ही पोपटाला पाहिलं असेलच, मात्र कुत्र्याचा आवाज काढणारा पोपट कोणाच्या गावीही नसेल. अशाच प्रकारच्या कुत्र्याचा आवाज काढणा-या एक पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला बरेचशे लाइक आणि शेअरही मिळाले आहेत. कुत्र्यांच्या सहवासात राहिल्यामुळे हा पोपट भुंकत तर नसेल ना, याबाबतही अस्पष्टता आहे. पण तरीही हा कुत्र्याच्या आवाजात भुंकणार पोपट खूपच व्हायरल होतोय.
वन्य जीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, शहरातील बहुतांश घरात आजही पोपटांना पिंजऱ्यात कैद केल्याचे दिसून येते. त्यामुळे परंपरागत चालणारी पोपटांची कैदेची मालिका कधी संपणार, असा सवाल वन्यप्रेमी उपस्थित करीत आहेत. वनकायद्याची सर्रास पायमल्ली होत असताना वनविभाग मात्र बघ्यांची भूमिका घेत आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. मनुष्याचे अनुकरण करून तसेच शब्दोच्चार करणे, हे पोपटाचे वैशिष्ट्य. त्यामुळे घरोघरी पोपटाला पिंजऱ्यात कैद करून पाळण्यावर भर दिला जातो. मात्र, पोपट हा वन्यजीव अधिनियमात मोडणारा पक्षी आहे. पोपटाला बंदिस्त करून ठेवणे हे वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन ठरते. हा बोलका वन्यजीव अधिक काळ एकाच घरात असल्यास तो घरातील मंडळींना नावाने हाक मारतो. त्यामुळे तो सर्वांच्याच आवडीचा पक्षी बनला आहे. मात्र, त्याला शोभेची वस्तू म्हणून कैद करून ठेवणे हा अपराध ठरतो. ही बाब वनविभागाला माहीत असतानाही कोणतीच कारवाई केली गेली नाही. आणखी किती दिवस पोपटांना बंदिस्त राहून जीवन जगावे लागेल, असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी केली जात असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील काही शिकारी पोपटांची घरटी शोधून त्यांची पिल्ले गोळा करतात आणि पालनपोषण करून त्यांची विक्री करतात. ‘लव्हबर्ड’सारख्या पक्ष्यांच्या आड पोपटांचीही विक्री जिल्ह्यात होत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे या तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींची आहे.