डिजिटल घड्याळाला बाँब समजून मुस्लीम विद्यार्थ्याला केली अटक
By admin | Published: September 17, 2015 11:27 AM2015-09-17T11:27:15+5:302015-09-17T11:42:42+5:30
इंजिनीअरिंगचं प्रोजेक्ट म्हणून घरून डिजिटल घड्याळ बनवणा-या १४ वर्षांच्या मुस्लीम मुलाला पोलीसांनी बाँब बनवल्याच्या संशयावरून अटक केल्याने
Next
>ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. १७ - इंजिनीअरिंगचं प्रोजेक्ट म्हणून घरून डिजिटल घड्याळ बनवणा-या १४ वर्षांच्या मुस्लीम मुलाला डल्लास पोलीसांनी बाँब बनवल्याच्या संशयावरून अटक केल्याने खळबळ माजली आहे. अहमद मोहम्मद असे या मुलाचे नाव असून त्याने शालेय उपक्रमाचा भाग म्हणून घरी डिजिटल घड्याळ बनवले आणि ते शाळेत सादर केले.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये रूची असलेल्या अहमदचं त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी कौतुक केलं, परंतु दुस-या एका शिक्षकाला घड्याळातून बीपचा आवाज आल्यामुळे बाँबची भीती वाटली. अर्थात केवळ एक भीती म्हणून ही बाब येथे संपली नाही तर त्यांनी पोलीसांना बोलावले आणि पोलीसांनीही शहानिशा न करता मुलाला बेड्या ठोकून बालसुधारगृहात धाडले.
घड्याळाची तपासणी करताना आतल्या वायरी व एकंदर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर बघून हा बाँब असू शकतो अशी भीती आम्हालाही वाटल्याचे पोलीसांनी सांगितले.
अमेरिकेमधल्या इस्लामी संघटनांनी हा इस्लामोफोबियाचा भाग असल्याचे म्हटले आहे. जर त्या मुलाचे नाव अहमद मोहम्मद नसते तर बाँबचा विचारदेखील कुणाच्या मनाला शिवला नसते असे एका संघटनेने खेदाने नमूद केले आहे. अहमद हा अत्यंत हुषार मुलगा असून तो त्याच्या अभिनव कल्पना सगळ्यांबरोबर शेअर करतो असे त्याला ओळखणा-यांनी सांगितले असून हाप्रकार दुर्देवी असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, झाल्या प्रकाराची दखल घेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अहमदची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.