सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांकडून डिजीटल इंडियाचे कौतुक
By admin | Published: September 27, 2015 12:01 PM2015-09-27T12:01:44+5:302015-09-27T12:01:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया मोहीमेला सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया मोहीमेला सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गजांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाइ, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, क्वालकॉमचे सीईओ पॉल जेकब आदी दिग्गज मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत भारताती आगामी योजनांची माहिती देत डिजीटल इंडियाचे भरभरुन कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौ-यावर असून रविवारी मोदींनी सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओसोंबत चर्चा केली. अॅपलचे टिम कुक, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, गुगलचे सुंदर पिचाइ, क्वालिकॉमचे पॉल जेकब, सिस्कॉचे जॉन चेम्बर्स आदी दिग्गज मंडळी या बैठकीला उपस्थित होती. भारतातील पाच लाख गावांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं हे आमचे उद्दीष्ट असल्याचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सांगितले. डिजीटल इंडिया व मेक इन इंडिया मोहीमेत हे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले. तर क्वालकॉमचे पॉल जेकब यांनी भारतात १५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करुन संशोधन केंद्र सुरु करणार असल्याचे जाहीर केले. इंटरनेट क्षेत्रात भारतात वेगाने पुढे जात असल्याचे सुंदर पिचाइ यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जागतिक दृष्टीकोन आहेत, ते नक्कीच भारताची प्रतिमा बदलतील असे सांगत सिस्कॉचे जॉन चेंबर्स यांनी मोदींच्या डिजीटल इंडियाचे कौतुक केले.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे नव्या जगातील नवे शेजारी आहेत, ट्विटरने तर सर्वांनाच रिपोर्टर बनवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. प्रत्येक नागरिकाला व लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान हे महत्त्वाचे साधन असल्याचे मोदींनी नमूद केले.