पहाटेच्या स्वप्नात थेट मृत्यूच्या दारात! ७.८ तीव्रतेच्या भूकंपाने तुर्कस्तान, सीरिया उद्ध्वस्त; ४५ देश मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 08:36 AM2023-02-07T08:36:01+5:302023-02-07T08:36:43+5:30
भारत सरकारने सांगितले की, एनडीआरएफची १०० कर्मचारी असलेली दोन पथके तुर्कस्तानला पाठविण्यात येणार आहेत. ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत.
अंकारा : तुर्कस्तान आणि सीरिया या देशांना सोमवारी पहाटेच आलेल्या भूकंपाने अक्षरश: उद्ध्वस्त केले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. गाढ झोपेत असलेल्या अनेकांना बाहेर पडण्यासाठीही वेळ मिळाला नाही. परिणामी, मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत गेला. लोकांना प्रचंड थंडी आणि पाऊस पडत असतानाही घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे मदतीसाठी सरसावणाऱ्या देशांची संख्याही वाढत गेली. भारत, युरोपीयन संघासह तब्बल ४५ देशांनी मदतीची तयारी दर्शविल्याचे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सांगितले.
भारत सरकारने सांगितले की, एनडीआरएफची १०० कर्मचारी असलेली दोन पथके तुर्कस्तानला पाठविण्यात येणार आहेत. ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत.
इस्रायल, अझरबैजान, रोमानिया, नेदरलँडस्ही बचावकार्यासाठी पथके पाठवत आहेत. तुर्कस्तानमध्ये भूकंपग्रस्त भागात रक्तदान शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. रशियानेही तुर्की आणि सीरियाला मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. पुतीन सध्या दोन इलुशिन-७६ विमाने पाठविण्याच्या तयारीत आहेत. भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या असून आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत.
४० सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के -
भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. येथील अनेक भागांत ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले.
१० शहरांमध्ये आणीबाणी -
तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशातील १० शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भविष्यवाणी खरी ठरली -
सोमवारी पहाटे दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हजारो लोकांचा बळी गेला, पण सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) संस्थेमध्ये काम करणाऱ्या फ्रँक हूगरबीट्स या संशोधकाने या दुर्घटनेचा इशारा तीन दिवस आधीच वर्तवला होता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता त्यांनी “लवकरच किंवा नंतर, दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या प्रदेशात ७.५ तीव्रतेचा भूकंप होईल” असे ट्वीट केले होते. त्यांनी भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता. तीन दिवसांनंतर त्यांचा इशारा खरा ठरला आणि ट्वीट प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
भूकंपामागील कारण -
पृथ्वीच्या भूगर्भात मोठ-मोठ्या आकाराच्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. त्याखाली लाव्हारस आहे. त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. त्यांची ज्यावेळी एकमेकांशी टक्कर होते, त्यावेळी खूप दबावामुळे या प्लेट्सचे तुकडे होऊ लागतात. त्यामुळे भूगर्भातील ऊर्जा तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्यातून होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे भूकंप येतो. तुर्कस्थानचा बहुतांश भाग हा एनाटोलियन टॅक्टोनिक प्लेटच्या क्षेत्रात आहे. ही प्लेट युरोशियन, आफ्रिकन, अरेबियन या तीन प्लेटच्या मधोमध आहे. आफ्रिकन, अरेबियन प्लेट आपल्या जागेवरून हलली की तुर्कस्थानचा भाग असलेल्या प्लेटवर सारा दबाव येऊन त्या देशामध्ये भूकंप येतो.