गुलाल आपलाच... सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी भारतीय वंशाचे थर्मन शनमुगरत्नम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:05 PM2023-09-01T23:05:32+5:302023-09-01T23:14:21+5:30
सिंगापूरच्या ९ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी १ सप्टेंबर रोजी मतदान झाले.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक विराजमान झाल्यानंतर भारतीयांनी आनंद व्यक्त केला होता. आता सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदीही भारतीय वंशाचे थर्मन शनमुगरत्नम यांनी निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी गुलाल उधळला आहे. येथील निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी यासंदर्भात घोषणा करताना थर्मन शनमुगरत्नम हे ७०.४० टक्के मतांसह विजयी झाल्याचं स्पष्ट केलं.
सिंगापूरच्या ९ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी १ सप्टेंबर रोजी मतदान झाले. २७ लाखांपेक्षा अधिक नागरिक मतदानासाठी पात्र होते, त्यापैकी अधिकाधिक लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला.
६६ वर्षीय थर्मन शनमुगरत्नम यांच्याशिवाय राष्ट्रपति पदासाठी आणखी दोन उमेदवार स्पर्धेत होते. सरकारी मालकिच्या कंपनीचे माजी गुंतवणूक प्रमुख एनजी कोक सॉन्ग आणि सरकारी वीमा कंपनीचे माजी प्रमुख टैन किन लियान यांमध्ये ही ही लढत होती.
थर्मन शनमुगरत्नम सिंगापूरचे उप-प्रधानमंत्री राहिले आहेत. त्यांनी शिक्षण आणि अर्थ मंत्री पदही सांभाळले आहे.