थेट लंडनहून 12 हजार किमी प्रवास करुन चीनमध्ये दाखल झाली मालगाडी
By admin | Published: April 29, 2017 03:16 PM2017-04-29T15:16:53+5:302017-04-29T18:01:35+5:30
चीन आणि ब्रिटनमध्ये व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट रेल्वसेवा सुरु झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
यिवू, दि. 29 - चीन आणि ब्रिटनमध्ये व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट रेल्वसेवा सुरु झाली आहे. शनिवारी सकाळी ब्रिटनहून पहिली मालगाडी पूर्व चीनच्या यिवू शहरात दाखल झाली. तब्बल 12 हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही ट्रेन चीनमध्ये पोहोचली. जगातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. आधुनिक काळातील सिल्क रोडने पश्चिम युरोपबरोबर व्यापारी संबंध वाढवण्याचे चीनचे उद्दिष्टय आहे.
चीनने 2013 पासून वन बेल्ट, वन रोड पॉलिसीवर काम सुरु केले. या धोरणातंर्गत दुस-या देशांपर्यंत रेल्वेमार्गाने पोहोचण्याचे चीनचे लक्ष्य आहे. ब्रिटनहून आलेल्या या ट्रेनमध्ये व्हिस्की, लहान मुलांचे दूध, औषधे आणि मशिनरी असे साहित्य आहे. 10 एप्रिलला ही ट्रेन लंडनहून निघाली. फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, बेलारुस, रशिया आणि कझाकस्तान या देशांचा प्रवास करुन 20 दिवसांनी ही ट्रेन यिवूमध्ये दाखल झाली.
यिवू हे वस्तू व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. रशियाच्या ट्रान्स-सायबेरीयन रेल्वेमार्गापेक्षा हा मार्ग मोठा आहे. पण चीन-माद्रिद मार्गापेक्षा हे अंतर 1 हजार किलोमीटरने कमी आहे. 2014 मध्ये चीन आणि स्पेनमध्ये अशा प्रकारची रेल्वे सेवा सुरु झाली आहे. आयात-निर्यातीसाठी रेल्वेमार्ग हा हवाई मार्गापेक्षा स्वस्त आहे तसेच समुद्र मार्गापेक्षा वेगवान आहे. सागरी मार्गापेक्षा रेल्वेने महिन्याभराचा वेळ वाचतो. चीन रेल्वे कॉर्पोरेशनने ब्रिटन ते चीन हे अंतर कापण्यासाठी 18 दिवसाचा वेळ ठरवला होता. पण त्यापेक्षा दोन दिवस जास्त लागले.
खुश्कीचा मार्ग
‘सिल्क रोड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन काळात युरोपीय देशांशी व्यापार करण्याच्या खुश्कीच्या मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने थेट लंडनला रेल्वेने माल पाठविण्यास सुरुवात केली आहे.
प्राचीन रेशीम मार्गांचा मागोवा
युरोपीय प्रभाव आणि आधुनिक अर्थकारण जगावर हावी होण्याआधी सुमारे हजार वर्षांपूर्वी भारत आणि चीन या दोन सशक्त अर्थव्यवस्था होत्या. त्यांचा व्यापार सातासमुद्रांच्या पलिकडे युरोप आणि आफ्रिकेतील देशांशी व्हायचा. सागरी वाहतूक आणि रस्ता म्हणजेच खुश्कीच्या मार्गाने हा व्यापार व्हायचा. रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चाले. व्यापाऱ्यांचे काफिले त्या काळी ज्या रस्तामार्गाने जात ते मार्ग प्राचीन ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखले जातात. विविध युरोपीय देशांपर्यंतची रेल्वेने थेट मालवाहतूक हा त्याचाच एक भाग आहे.