भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:37 AM2024-10-26T08:37:50+5:302024-10-26T08:38:15+5:30
विशिष्ट अंतरापर्यंत हे सैन्य मागे गेल्यावर दाेन्ही सैन्यांची गस्त सुरू हाेईल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील सीमेवर डेमचाेक आणि डेपसांग या वादग्रस्त व दाेन्ही देशांतील तणावाचे कारण ठरलेल्या ठिकाणावरून सैन्य माघारीस भारत आणि चीन या दाेन्ही देशांनी सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत पूर्ण हाेण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांत नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचा एक करार झाला. यात दोन्ही देशांनी सैन्य काही अंतरापर्यंत मागे घेण्यावर एकमत झाले होते. ब्रिक्स परिषदेतील चर्चेचे फलित रशियातील कझानमध्ये ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २३ ऑक्टोबरला याबाबत चर्चा होत एकमत झाले होते.
एप्रिल २०२० पूर्वीच्या स्थितीचा निकष
विशिष्ट अंतरापर्यंत हे सैन्य मागे गेल्यावर दाेन्ही सैन्यांची गस्त सुरू हाेईल. सैन्य काढून घेतल्यानंतर तेथील उभे तंबू व इतर बांधकाम पाडले जाईल. गस्त घालण्याचे स्वरूप एप्रिल-२०२०पूर्वीच्या स्थितीनुसार असू शकते.
जून-२०२० : गलवान खोरे तापले
गलवान खोऱ्यात जून-२०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान भयंकर संघर्ष पेटला होता. तेव्हापासून सीमेवर तणाव कायम होता. यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू होते. शेवटी चार वर्षांनंतर मार्ग निघाला.