ट्रम्प यांच्या आदेशाने भारतीय कुटुंबियांची ताटातूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:34 AM2020-07-04T04:34:20+5:302020-07-04T04:34:35+5:30
कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी हैदराबादला गेल्यापासून ते फेब्रुवारीपासून डलासमध्ये एकटेच आहेत. ते डाटा अॅनॅलिटिक्स इंजिनिअर आहेत
वॉशिंग्टन : कोरोनाच्या उद्रेकानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी एच-१ बी व्हिसासह नोकरीसाठी व्हिसा जारी करणे स्थगित केल्याने भारतीयांना कौटुंबिक ताटातूट सहन करण्यासोबत नोकरीची चिंताही सतावत आहे.
कोरोनाने मार्चमध्ये वडिलांचे निधन झाले. कोरोनाची साथ पसरल्याने पत्नी आणि दोन मुलांना डलास येथेच सोडून करण मुरगई भारताकडे रवाना झाले. तीन आठवड्यांपासून त्यांची कुटुंबापासून ताटातूट झाली. व्हिसासंबंधीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने ते कुटुंबापासून दुरावले आहेत. हा कौटुंबिक विरह कधी संपेल? ही चिंता करण मुरगई यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सतावत आहे. करण मुरगई हे एका बहुराष्टÑीय कंपनीसाठी माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन सल्लागार काम करण्यासोबत वडिलांचा नवी दिल्लीतील कारभारही पाहतात. त्यांच्या चार वर्षांच्या मुलीची भूकच नाहीशी झाल्याने तिला झटके येऊ लागले आहेत.
अशीच व्यथा डलास येथील संदीप वुदयागिरी यांची आहे. कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी हैदराबादला गेल्यापासून ते फेब्रुवारीपासून डलासमध्ये एकटेच आहेत. ते डाटा अॅनॅलिटिक्स इंजिनिअर आहेत. त्यांच्या पत्नी अर्पणा तक्कलपल्ली यांच्याकडे एच-४ व्हिसा आहे. व्हिसाचे नूतनीकरण केल्याशिवाय ती माघारी येऊ शकत नाही. अमेरिकेत काम करणाऱ्यांना अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे शिक्षा केली जात आहे. माझी नोकरीही धोक्यात आहे. एकीकडे राजकीय नेते भारत-अमेरिका मैत्रीची प्रशंसा करतात. तथापि, एकूणच अमेरिकेच्या व्हिसासंदर्भातील निर्णयाने या मैत्रीचा विश्वासघात केल्याचे वाटते, अशा शब्दांत तक्कलपल्ली यांनी खेद व्यक्त
केला.