असाही एक घटस्फोट; तिला जगातील सर्वात श्रीमंत महिला बनवणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 03:14 PM2019-01-10T15:14:43+5:302019-01-10T15:15:52+5:30
वॉशिंग्टनमधील कायद्यानुसार लग्नानंतर कमविलेली संपत्ती घटस्फोटानंतर पती- पत्नींमध्ये समान वाटली जाते.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा मालक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंजी बेजोस यांचा घटस्फोट होणार आहे. यावरून चर्चा रंगली असताना हे दांपत्य मालमत्तेच्या वाटणीवरून चर्चेत आले आहे. दोघांनी बुधवारी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. जेफ बेजोस यांच्या मालमत्तेची वाटणी झाल्यास मॅकेंजी यांना त्यांची निम्मी संपत्ती मिळणार आहे. आश्चर्यकारक म्हणजे यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला बनणार आहेत.
वॉशिंग्टनमधील कायद्यानुसार लग्नानंतर कमविलेली संपत्ती घटस्फोटानंतर पती- पत्नींमध्ये समान वाटली जाते. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान असलेले जेफ बेजोस यांची एकूण 9.59 लाख कोटींची संपत्ती आहे. यानुसार मॅकेंजी यांना 4.76 लाख कोटी रुपये मिळू शकतात.
सध्या जगातील सर्वात श्रीमंत महिला एलाइस वॉल्टन
मॅकेंजी यांना 4.76 लाख कोटी रुपये मिळत असतील तर त्या जगातील श्रीमंत महिला बनू शकतात. मात्र, सध्या एलाइस वॉल्टन या सर्वात श्रीमंत महिला आहेत. एलाइस वॉल्टन या वॉलमार्ट या विक्री दालनाच्या मालक आहेत. त्यांच्याकडे 3.22 लाख कोटींची संपत्ती आहे.
संपत्तीमध्ये हिस्सा नाही मागितला तर...
मॅकेंजी या जेफ बेजोस यांच्याकडून संपत्तीत वाटा मागणार नसल्याचेही बोलले जात आहे. कारण घटस्फोटानंतरही दोघे एकमेकांसोबत परिवार आणि मित्र-मैत्रिणीसारख्या राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या वर्षी सुरु केलेल्या चॅरिटीच्या कामांना एकत्र येऊन पूर्ण करणार आहेत.