कार चालवणार्या पत्नीला सौदीमध्ये मिळाला तलाक
By admin | Published: May 15, 2014 03:35 AM2014-05-15T03:35:49+5:302014-05-15T03:35:49+5:30
सौदी अरेबियात पत्नीने कार चालविल्याने पतीने तिला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे. कार चालविण्याची चित्रफीत पतीला दाखवणे या महिलेला महागात पडले.
दुबई : सौदी अरेबियात पत्नीने कार चालविल्याने पतीने तिला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे. कार चालविण्याची चित्रफीत पतीला दाखवणे या महिलेला महागात पडले. ही महिला चित्रफीत दाखवून पतीला सरप्राइज देऊ इच्छित होती. मात्र, पतीने चित्रफीत पाहिल्यानंतर तिच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. सौदीत महिलांनी कार चालविण्यास बंदी आहे. पत्नीने सामाजिक रुढी-परंपरांचे उल्लंघन केले असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. राज्याच्या पूर्व प्रांतात राहणार्या या व्यक्तीला त्याच्या पत्नीने ती कार चालवीत असल्याची चित्रफीत व्हॉटस् अपवरून पाठविली. ही चित्रफीत पाहून पती हैराण झाला. पत्नीने आपणाला न सांगता हा निर्णय घेतल्याने नाराज होऊन त्याने तलाक देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीने कायदा आणि सामाजिक रुढींचे उल्लंघन केले असल्याने आपण तिच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे या तरुणाने सांगितल्याचे वृत्त ‘द गल्फ न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. चित्रफीत पाहिल्यानंतर आपण पत्नीला मारहाण केली नाही, असे या तरुणाने न्यायाधीशांना सांगितले. सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. देशात महिला अनेकदा कार चालवून याला विरोध दर्शवीत आल्या आहेत. काही महिलाच उघडपणे कार चालविण्याचे साहस दाखवितात. महिला कार चालविताना आढळून आल्या तर वाहतूक पोलीस त्यांना पकडतात व यापुढे कार चालविणार नाही, अशी लेखी हमी त्यांच्याकडून घेतात. (वृत्तसंस्था)