लंडनमध्ये हिंदुजा यांची तीन वर्षांनंतर दिवाळी! ३०० हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 06:22 AM2022-11-06T06:22:51+5:302022-11-06T06:23:00+5:30
लंडनच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनलेला तसेच गतकाळातील पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण समजला जाणारा हिंदुजांचा वार्षिक दिवाळी सोहळा यंदा तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
लंडन :
लंडनच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनलेला तसेच गतकाळातील पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण समजला जाणारा हिंदुजांचा वार्षिक दिवाळी सोहळा यंदा तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या थाटामाटात साजरा झाला. कोरोनामुळे या सोहळ्याला ब्रेक लागला होता. ऋषी सुनक इंग्लंडच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याने यंदा या कार्यक्रमाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती.
हिंदुजा यांच्या कार्लटन हाऊस टेरेस येथे हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी आमंत्रित खासदार, राजदूत आणि मुत्सद्दी अधिकारी, बडे व्यावसायिक, नेते आणि पत्रकारांसह ३०० हून अधिक पाहुण्यांचे स्वागत हिंदुजा कुटुंबाकडून करण्यात आले. राजे चार्ल्स तृतीय यांचे मुख्य खासगी सचिव सर क्लाइव्ह अल्डरटन यांनी नवनियुक्त राजांकडून दिवाळीच्या विशेष शुभेच्छा दिल्या. लंडनमधील हिंदू समुदायाचे कौतुक करताना महापौर सादिक खान म्हणाले, ‘लंडन हे जगातील सर्वात मोठे शहर आहे आणि यामागील एक कारण म्हणजे हिंदू धर्मातील लंडनवासीयांनी दिलेले मोठे योगदान हे आहे.’
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत हिंदुजा समूहाचे सहअध्यक्ष गोपीचंद हिंदुजा तसेच त्यांचे बंधू प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी दिवाळीचे महत्त्व, देवी लक्ष्मीबद्दल आणि दानाच्या कर्मातून मिळालेला आशीर्वाद आणि समाधानाचा समावेश कसा होतो, याबद्दल सांगितले. गोपीचंद हिंदुजा यांनी त्यांचे थोरले बंधू एस. पी. हिंदुजा यांची उणीव भासत असल्याचे सांगत प्रकृती ठीक नसल्याने ते सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत, अशी खंतही व्यक्त केली.
मजूर पक्षाचे अध्यक्ष खासदार नदिम झहावी, कोरोना काळात माजी आरोग्य सचिव राहिलेले खासदार मॅट हॅनकॉक, विम्बल्डनचे परराष्ट्र कार्यालय मंत्री लॉर्ड अहमद आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी या सोहळ्यासाठी सर्व धर्म, समुदाय आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील इतक्या लोकांना एकत्र आणल्याबद्दल हिंदुजा कुटुंबाचे आभार मानले.
मान्यवरांना लक्ष्मीची मूर्ती भेट
कमल प्रकाश हिंदुजा व हर्ष अशोक हिंदुजा यांनी मान्यवरांना लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून दिली. अर्जुन रामपाल, त्याची जोडीदार गॅब्रिएला, पार्श्वगायिका कुनिका कपूर, आर्सेलरच्या एल. एन. मित्तल यांच्या पत्नी उषा मित्तल तसेच ३८ देशांतील २२ उच्चायुक्तांसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. दिवाळीच्या परंपरेला आणि हिंदुजा कुटुंबाच्या आचारसंहितेला अनुसरून यावेळी पाहुण्यांनी निवडक शाकाहारी भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.