कुत्रा मानवाचा ११ हजार वर्षांपासूनचा साथीदार, डीएनए अभ्यासाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:08 AM2020-10-31T04:08:18+5:302020-10-31T07:25:32+5:30
DOG & Human : ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश साऱ्या जगभरात पसरला. याच वंशातून कालांतराने युरोपात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या विविध प्रजाती निर्माण झाल्या.
लंडन : कुत्रा हा माणसाचा सर्वांत जुना म्हणजे ११ हजार वर्षांपूर्वीपासूनचा विश्वासू साथीदार आहे, हे डीएनए चाचणीतून सिद्ध झाले आहे. शीतयुगाच्या अखेरीपासून ही दोस्ती आजवर चालत आली
आहे.
माणसाइतकाच कुत्रादेखील प्राचीन प्राणी आहे. यासंदर्भात लंडन येथील क्रिक इन्स्टिट्यूटमधील संशोधक डॉ. पाँट्स स्कोगलंड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुत्र्याच्या डीएनएचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. ते म्हणाले की, इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्रा पाळण्यास माणसाने सर्वप्रथम सुरुवात केली, असेही या अभ्यासातून दिसून आले. उत्तर गोलार्धामध्ये प्राचीन काळी माणूस व कुत्रा यांची एकमेकांना उत्तम साथ होती. कालांतराने पाच वर्गवारीतील कुत्रे साऱ्या जगात आढळू लागले.
वसाहतवादाच्या काळात युरोपातील विविध जातींचे कुत्रे जगभरात गेले; पण त्याही आधी अमेरिका, आशिया, आफ्रिका, ओशियाना या भागात तेथील कुत्र्यांच्या स्थानिक जाती प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्याच. कुत्र्यांच्या इतिहासाबद्दल काही गोष्टी अद्यापही अज्ञात होत्या. त्यांची उकल कुत्र्यांच्या डीएनएच्या अभ्यासामुळे झाली आहे. डॉ. स्कोगलंड यांनी सांगितले की, ११ हजार वर्षांपूर्वीपासून माणसाने कुत्रे पाळण्यास का सुरुवात केली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. (वृत्तसंस्था)
ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश जगभर पसरला
ताम्रयुगामध्ये कुत्र्यांचा एक वंश साऱ्या जगभरात पसरला. याच वंशातून कालांतराने युरोपात आढळणाऱ्या कुत्र्यांच्या विविध प्रजाती निर्माण झाल्या.
या संशोधनासाठी क्रिक इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी कुत्र्यांच्या २७ प्राचीन प्रजातींच्या डीएनएचे नमुने तपासले. त्यांची सध्या अस्तित्वात असलेल्या कुत्र्यांच्या प्रजातीशी तुलना करण्यात आली.