अमेरिकन पासपोर्टचे असे करा नूतनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:57 AM2023-03-06T06:57:29+5:302023-03-06T06:58:17+5:30
भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेतून येऊन अर्ज करण्याची गरज नाही.
प्रश्न : माझ्या अमेरिकी पासपोर्टची मुदत लवकरच संपत आहे. माझ्या पासपोर्टचे भारतातून नूतनीकरण कसे करता येईल?
उत्तर : भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेतून येऊन अर्ज करण्याची गरज नाही. भारतातील अमेरिकी लोकांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी यू.एस. काउन्सलेटने हैदराबाद येथील पासपोर्ट प्रक्रिया केंद्र याच कामासाठी आता निश्चित केले आहे. जर तुमचा अलीकडचा पासपोर्ट तुमचे वय किमान १६ वर्षे (वय १५ पेक्षा कमी नसावे) असताना जारी झालेला असेल आणि तुमच्या अलीकडच्या पासपोर्टची वैधतादेखील दहा वर्षांची असेल, तर तुम्ही मेलद्वारे अर्ज करण्यासाठी पात्र आहात. ज्यांना पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे आणि ज्यांनी नमूद निकष पूर्ण केलेले आहेत त्यांनी आपला नूतनीकरणाचा अर्ज यू.एस. कौन्सुलेटच्या हैदराबाद कार्यालयाकडे पाठवावा.
जर तुम्ही प्रौढ असाल आणि तुमच्याकडे कधीही अमेरिकेचा पासपोर्ट नसेल किंवा १८ वर्षांखालील बालक असले तर त्यांनी यू.एस. काउन्सलेटच्या मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या अमेरिकी नागरिकांना पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे, त्यांनी नूतनीकरण करणारे शुल्क Pay.gov या वेबसाइटवर अमेरिकी डॉलर या चलनात करावे.
नूतनीकरणाच्या अर्जाचे शुल्क भरण्यासाठी अर्जदार क्रेडिट कार्डाचादेखील वापर करू शकतात. (पासपोर्ट पुस्तिका शुल्क : १३० अमेरिकी डॉलर). अर्जाचे शुल्क भरल्यानंतर, अर्ज पाठविण्यासाठी कोणत्याही स्थानिक कुरिअर सेवेने तो पाठवता येईल. यासोबत अलीकडचा पासपोर्टदेखील हैदराबाद येथील यू.एस. काउन्सलेटकडे पाठवावा लागेल. यू.एस. काउन्सलेटच्या हैदराबाद कार्यालयात मेलद्वारे नूतनीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. अर्जदाराने जो पत्ता नमूद केला असेल त्या पत्त्यावर पासपोर्ट कुरिअरद्वारे पाठवला जातो.
- आपल्या प्रवासाच्या तारखांचा विचार करून आणि आमच्या वेबसाइटवरील सूचना समजून घेऊन अमेरिकी नागरिकांनी आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी नियोजनबद्ध वेळेत पाठवावा.
- तत्काळ प्रवासासाठी पासपोर्टचे तत्काळ नूतनीकरण हवे असलेल्या लोकांनी आमच्या वेबसाइटवर ‘पात्रता’ या सेक्शनमध्ये जाऊन माहिती घ्यावी.
- पासपोर्ट नूतनीकरणाच्या प्रश्नांसंदर्भात HydPPT@state.gov येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports. येथे भेट द्यावी.