काश्मीर प्रकरणाला अफगाणिस्तानशी जोडू नका, अमेरिकेनं पाकला फटकारले
By admin | Published: October 13, 2016 10:15 AM2016-10-13T10:15:37+5:302016-10-13T10:24:08+5:30
भारताची कोंडी करण्यासाठी काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानातील शांतता ठरावाशी जोडण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा फटकारले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13- भारताची कोंडी करण्यासाठी काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानातील शांतता ठरावाशी जोडण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा फटकारले आहे. तसेच भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचेही अमेरिकेने समर्थन केले आहे. उरी येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दिलेले प्रत्युत्तर हे आत्मसंरक्षण अधिकारांतर्गत येते, असे म्हणत अमेरिकेने कारवाईला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या वर्षाअखेरपर्यंत भारताला एनएसजीचे ( Nuclear Suppliers Group ) सदस्यत्व मिळेल, यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही व्हाईट हाऊसचे दक्षिण एशियाचे प्रभारी पीटर लावॉय यांनी स्पष्ट केले आहे.
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तसेच भारताविरुद्ध वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला अद्दल घडावी, यासाठी भारताकडून पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच बिथरलेल्या पाकिस्तानकडून आता भारताविरोधात कटकारस्थान रचले जात आहेत, याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने अमेरिकेकडे काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आणखी बातम्या
याचसदर्भात, गेल्या आठवड्यात लावॉय यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेत नेमलेल्या दोन विशेष राजदूतांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करावा यासाठी या अफगाणिस्तानचा दाखला दिला. 'काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय या भागात शांतता नांदणार नाही. तसेच अफगाणिस्तानमधील शांततेचा मार्गही काश्मीरमधून जातो हे अमेरिकेने ध्यानात घ्यावे', असा इशारा त्यांनी दिला होता. याच मुद्यावरुन काश्मीर प्रकरणाला अफगाणिस्तानशी जोडू नका, असे सांगत अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे.