संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:44 AM2019-08-14T03:44:17+5:302019-08-14T03:45:07+5:30
जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही.
इस्लामाबाद : जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. त्यामुळे ‘मूर्खांच्या नंदनवनात’ राहू नये, असा सल्ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशवासीयांना दिला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘नव्या प्रकारचा संघर्ष’ सुरू करावा, असे म्हटले. ‘तुम्ही लोक मूर्खांच्या नंदनवनात जगू नका. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणीही हार घेऊन स्वागताला उभे राहणार नाही. कोणीही तुमची तेथे वाट बघणार नाही,’ असे कुरेशी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आम्ही त्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दाद मागू, असे जाहीर केले होते. कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने ‘वस्तुस्थिती’ स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे.
कुरेशी यांनी कोणत्याही मुस्लिम देशाचे नाव न घेता सांगितले की, ‘मुस्लिम समुदायाचे पालकदेखील (गार्डियन्स आॅफ उम्माह) त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकणार नाहीत. जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. एक अब्जाच्या वर लोकसंख्येचा भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोकांनी तेथे गुंतवणूक केलेली आहे. आम्ही नेहमीच उम्माह आणि इस्लामबद्दल बोलतो; परंतु मुस्लिम समुदायाच्या पालकांनीदेखील भारतात गुंतवणूक केलेली असून, त्यांचे स्वत:चे हित तेथे आहे.’