माघार घेऊ नका - बगदादीचा दहशतवाद्यांना आदेश
By admin | Published: November 3, 2016 12:41 PM2016-11-03T12:41:23+5:302016-11-03T12:51:15+5:30
चहुबाजूंनी कोंडी झालेली असताना बगदादीने आपल्या दहशतवाद्यांना माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या, असा संदेश दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बगदादा, दि. 3 - इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवट्च्या टप्प्यात पोहोचली असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले आहे. चहुबाजूंनी कोंडी झालेली असतानाच बगदादीने एक ध्वनिफित प्रसारित करून आपल्या दहशतवाद्यांना माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या, असा संदेश दिला आहे.
बगदादीचा हा संदेश इसिसशी संबंधित असलेल्या अल फुरकान मीडियाने प्रसारित केला आहे. "माघार घेऊ नका. आत्मसन्मानाने तुमच्या भूमीवर टिकून राहा. असे करणे हे हजारवेळा लाजिरवाण्यापद्धतीने माघार घेण्यापेक्षा सोपे असते. निनेवाहमधील नागरिकांनी, विशेषत: दहशतवाद्यांनी स्वत:मध्ये कोणत्याही प्रकारची दुर्बलता न आणता शत्रूचा सामना करावा." असे बगदादीने आपल्या संदेशात म्हटले आहे. जवळपास वर्षभरानंतर बगदादीकडून आलेला हा पहिलाच संदेश आहे.
आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसने इराक आणि सिरियात आपले बस्तान बसवले होते. मात्र इराकी फौजांनी अमेरिकन सैन्याच्या मदतीने आयएसविरोधात जोरदार आघाडी उघडून त्यांना इराकच्या बहुतांश भागातून हुसकावून लावले होते. दरम्यान, इसिसचा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावरही इराकी फौजांनी चाल करत या शहराला वेढा घातला असून, इराकी फौजा आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेला बगदादीचा क्रूर खेळ संपुष्टात येण्याची शक्यता आहे.