माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी
By Admin | Published: November 4, 2016 06:19 AM2016-11-04T06:19:15+5:302016-11-04T06:19:15+5:30
इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले
बगदाद : इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले आहे. चहुबाजूंनी कोंडी झालेली असतानाही बगदादीने अल फुरकान मीडियाच्या माध्यमातून एक ध्वनिफित प्रसारित करून आपल्या समर्थकांना ‘‘माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या आणि लढतच राहा,’’ असा संदेश दिला आहे.
आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसने इराक आणि सीरियात आपले बस्तान बसवले होते. मात्र इसिसचा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावरही इराकी फौजांनी चाल करत या शहराला वेढा घातला आहे. त्यामुळे इसिसची नाकेबंदीच झाली आहे. तिथे इराकी फौजा आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे.
त्यातच बगदादीला इराकी फौजांनी पूर्णपणे घेरल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या लढ्यावरच त्याचे अस्तित्व अवलंबून असल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्याने हा संदेश प्रसारित केला असावा, असे बोलले जात आहे. मात्र त्याने आता कितीही प्रयत्न केले तरीही गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला बगदादीचा क्रूर खेळ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (वृत्तसंस्था)
>क्रूरकर्मा बगदादी वर्षभराने काय बोलला?
कोणत्याही परिस्थितीती माघार घेऊ नका. आत्मसन्मानाने तुमच्या भूमीवर टिकून राहा.
असे करणे हे हजार वेळा लाजिरवाण्या पद्धतीने माघार घेण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते.
निनेवाहमधील नागरिकांनी, विशेषत: दहशतवाद्यांनी स्वत:मध्ये कोणत्याही प्रकारची दुर्बलता न आणता शत्रूचा सामना करावा.