दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा...; अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:47 AM2021-06-13T06:47:55+5:302021-06-13T06:48:47+5:30
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे.
वॉशिंग्टन : कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढविल्याने लोकांना या विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असे अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे.
हा कालावधी वाढविल्यास कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग आणखी फैलावू शकतो. ब्रिटनध्येही हे दिसून आले आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवडा असल्यास दोन डोसमधील कालावधी वाढविण्यास हरकत नाही, असेही फौसी म्हणाले.
भारताने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी दोनदा वाढविला. मार्चमध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. त्यानंतर हे अंतर १२ ते १६ आठवडे झाले.
कालावधीतील वृद्धीमुळे लसीची परिणामकारकता वाढते, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.(वृत्तसंस्था)
डेल्टा विषाणू अधिक घातक
डेल्टा विषाणू भारतामध्ये गेल्या वर्षी आढळला होता. त्यामुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येते. अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले की, डेल्टा विषाणूची संसर्गशक्ती पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी अधिक आहे.
n पुरेशा प्रमाणात लसीकरण न झालेल्या देशाला तर या विषाणूमुळे अधिक हानी होऊ शकते. लस न घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टाची बाधा झाली की, त्याचा प्रसार झपाट्याने होतो.
nकोरोनावर मात करण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस देणे हाच प्रभावी उपाय आहे, असे फौसी म्हणाले.