पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करु नका, दक्षिण कोरियाचा कंपन्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:11 PM2017-11-28T12:11:12+5:302017-11-28T13:17:06+5:30
दहशतवादाला पोसणा-या पाकिस्तानला अजून एक धक्का बसला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करु नका असा आदेश दक्षिण कोरियाने आपल्या कंपन्यांना दिला आहे.
सेऊल - दहशतवादाला पोसणा-या पाकिस्तानला अजून एक धक्का बसला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करु नका असा आदेश दक्षिण कोरियाने आपल्या कंपन्यांना दिला आहे. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र उपमंत्री चो ह्यून यांनी सांगितलं आहे की, 'पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये व्यवसाय करण्यासाठी इच्छुक कंपन्यांना सरकारने, असं करु नये यासाठी आतापर्यंत अनेकदा इशारा दिला आहे'.
'भारताची संवेदनशीलता दक्षिण कोरिया पुर्णपणे समजू शकतो. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये कंपन्या व्यवसाय करु नये यासाठी अडवण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करु', असं चो ह्यून म्हणाले आहेत. याआधी त्यांची दक्षिण कोरियाचे राजदूत म्हणून दिल्लीत नियुक्ती करण्यात आली होती.
चो ह्यून यांनी दक्षिण कोरियामधील काही कंपन्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असल्याचं कबूल केलं आहे. मात्र त्यांनी त्यांची नावे उघड करण्यास नकार दिला. पाकिस्तानने पीओके आणि गिलगिट-बलितिस्तानमध्ये ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी गुंतवणुकीसाठी प्रयत्न केला असता दक्षिण कोरियामधील कंपन्या इच्छुक असल्याचं समोर आलं होतं. यानंतर हा मुद्दा चर्चेला आला, ज्यानंतर सरकारने हा आदेश काढला आहे. याआधी भारताने चीनकडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये होणा-या मोठ्या गुंतवणूकीवरुन चिंता व्यक्त केली होती.