आम्हाला कमी लेखण्याची चूक करु नका, चीनचा पुन्हा भारताला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 04:59 PM2017-08-07T16:59:57+5:302017-08-07T17:03:30+5:30
सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला सातत्याने धमकी देणा-या चीनने पुन्हा एकदा पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे.
बिजींग, दि. 7 - सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला सातत्याने धमकी देणा-या चीनने पुन्हा एकदा पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे. प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याला भारताने कमी लेखू नये असे पीपल्स डेलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.
सिक्कीममध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने भारत-चीन सीमारेषेचे उल्लंघन करुन चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. भारताची ही कृती पूर्णपणे बेकायदा आहे असा आरोप करण्यात आला आहे. चीनचे कायदेशीर अधिकार आणि हित लक्षात घेऊन सर्व आवश्यक उपायोजना करु असे पीपल्ड डेलीच्या वृत्तात म्हटले आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही असा विश्वास भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.
भूतानच्या हद्दीतील डोकलाममधून भारत आणि चीनने सैन्य मागे घेणे हाच दोन्ही देशांसाठी उत्तम पर्याय आहे असे सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले. सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ चीनच्या रस्ता बांधणीच्या हट्टामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आहे. चीनने उद्या अशी कोणती आगळीक केलीच किंवा युद्धाची परिस्थिती उदभवली तर भारतीय लष्कर उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असे भारतीय सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले.
गेल्या 50 दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून युद्धा हा या समस्येवर उपाय नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. व्दिपक्षीय चर्चा, संयमाने तणाव कमी होऊ शकतो असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मागच्या आठवडयात संसदेत सांगितले आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत-चीन संघर्षात अनेक देशांचा भारताला पाठिंबा आहे. पण एकाही देशाचा भारताला पाठिंबा नाही असे चीनचे म्हणणे आहे.