आमच्यात लक्ष घालू नका!
By admin | Published: September 5, 2016 04:12 AM2016-09-05T04:12:56+5:302016-09-05T04:12:56+5:30
आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असे बांगलादेशने रविवारी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले.
ढाका : आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असे बांगलादेशने रविवारी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. १९७१च्या युद्धातील गुन्हेगार व जमात ए इस्लामीचा नेता मीर कासीम अली (६३) याला शनिवारी रात्री फाशी दिल्यानंतर पाकिस्तानने आम्हाला खूप दु:ख झाल्याचे म्हटले होते.
बांगलादेशने पाकिस्तानच्या येथील उच्चायुक्ताला बोलावून त्याच्याकडे भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशचे अतिरिक्त परराष्ट्र सचिव (द्विपक्षीय कामकाज) कामरूल अहसान यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त समिना मेहताब यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या देशाने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा निषेध नोंदवला.
मीर कासीम अली याचा मृतदेह रविवारी पहाटे त्याच्या माणिकगंज या गावात पुरण्यात आला. कासीम हा जमात ए इस्लामीला मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवायचा. त्याला शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काशिमपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धातील गुन्हेगारांमध्ये मीरचा समावेश होता. (वृत्तसंस्था)
>मीर कासीम घ्यायचा पाकिस्तानची बाजू
मीर कासीम याचा पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या अल बदर या बंडखोरांच्या तुकडीत समावेश होता. छळ करण्याच्या केंद्रांमध्ये त्याने शेकडो बांगलादेशींना ठार मारले असा त्याच्यावर आरोप होता व अध्यक्षांनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. या युद्धात पाकिस्तानी लष्कर आणि त्याच्या बांगलादेशातील सहानुभूतीदारांकडून तीन दशलक्ष लोक ठार झाले, असे सांगण्यात येते.