भारताविरुद्ध गरळ ओकू नका : शरीफ
By admin | Published: December 20, 2015 03:03 AM2015-12-20T03:03:41+5:302015-12-20T03:03:41+5:30
भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ
इस्लामाबाद : भारताशी नुकत्याच सुरू झालेल्या शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भारताविरुद्ध कोणतीही वक्तव्ये करू नका, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपले मंत्री आणि सहकाऱ्यांना दिला आहे.
शरीफ यांच्या एका विश्वासू सहकाऱ्याचा हवाला देऊन ‘द नेशन’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘दफन केलेले मुद्दे उकरून काढणारी वक्तव्ये करण्यापेक्षा शांतता चर्चेला प्रोत्साहन देणारी’ वक्तव्ये करा. शांततेस आणखी चालना मिळावी यासाठी प्रोत्साहन द्या,’ असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. शांतता प्रक्रियेला नुकसान होईल, अशी कोणतीही वक्तव्ये करण्यापासून मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना रोखण्यात आल्याचे हे वृत्त म्हणते.
भारताशी संबंध सुधारण्याबाबत नवाज शरीफ आशावादी असून, भारत-पाक संबंध सुधारल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण आशियाला होईल, असे शरीफ यांना वाटते. भारतातून येत असलेल्या काही वक्तव्यांवर शरीफ नाराज आहेत; पण हे भारत सरकारचे धोरण नसावे, असे शरीफ यांना वाटते. उभय पक्ष चर्चेसाठी एकत्र आल्यानंतर काश्मीर, दहशतवाद आणि व्यापार या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची शरीफ यांची इच्छा आहे, असे या वृत्तात म्हटले. (वृत्तसंस्था)
पाकचे लष्करी नेतृत्वही राजी?
अन्य एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या वृत्तात पुढे म्हटले आहे की, भारतासोबतच्या शांतता चर्चेबाबत शरीफ आणि लष्करी नेतृत्व यांचे एकमत झाले आहे; महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समझोता करू नये, असे या दोघांनाही वाटते. शरीफ आणि लष्करी अधिकारी यांच्यात एकमत झाले असेल तर ही सकारात्मक घडामोड आहे, असे विश्लेषकांना वाटते.
पुढील महिन्यात बैठक
भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला होता. त्यात उभय देशांतील सर्वंकष चर्चा सुरू करण्यास सहमती झाली होती. चर्चेचा आराखडा तयार करण्यासाठी दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची पुढील महिन्यात बैठक होणार आहे.
संवाद आवश्यकच - मसूद खान
पाकिस्तानशी संवाद साधण्याबाबत भारत गंभीर आहे, त्यामुळे संवादामुळेच दोन्ही देशांना पुढे जाता येईल असे विधान पाकिस्तानचे चीनमधील माजी राजदूत मसूद खान यांनी केले आहे.
पाकिस्तानने नेहमीच संवादाचा आग्रह धरला होता आणि भारताने घेतलेली आताची भूमिका म्हणजे आमचा नैतिक विजयच आहे असे मतही त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
भारताशी चर्चा सुरू करण्यासाठी पाकने वारंवार प्रयत्न केले हे दोन अण्वस्त्रसंपन्न देशांत संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. सध्या दोन्ही देशांनी घेतलेली भूमिका हा सकारात्मक संकेत आहे.
पुढील महिन्यामध्ये आगामी प्रक्रिया ठरविण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव भेटतील, असेही खान यांनी सांगितले. विश्वासाची भावना वाढीस लागण्यासाठी दोन्ही देशांच्या लोकांंमध्ये संपर्क, संवाद वाढण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
मोदी - शरीफ भेट जानेवारीत?
स्वित्झर्लंडमधील दावोस-क्लोस्टर्स येथे जानेवारीत ४६वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होणार असून, या फोरमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या दोघांची तेथेही भेट होण्याची शक्यता आहे.