कमकुवत समजू नका, पाकच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्र्यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 01:07 PM2017-08-07T13:07:50+5:302017-08-07T13:14:20+5:30
पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.
लाहोर, दि. 7 - पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत. इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटप करारातंर्गत पाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात असून त्यात भारत आणि अमेरिका सहभागी आहेत असा गंभीर आरोप ख्वाजा असिफ यांनी केला आहे.
अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधात कट रचले जात असून, त्याला भारताची साथ आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असा उलटा आरोप ख्वाजा असिफ यांनी केला. पाकिस्तानला शांतता आणि शेजारी देशांबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण कोणी याला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये अशा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भारताला दिला.
सिंधू पाणी वाटप करारासंबंधीच्या कटात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे सहभागी आहेत ते ख्वाजा असिफ यांनी सांगितले नाही. करारातील जे नियम आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला अंधारात ठेवले असे असिफ यांचे म्हणणे आहे.
काय आहे करार
– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.
– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.
– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.
– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते.
पाकिस्तानवर होईल परिणाम…
– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.
– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.
– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.