रेल्वे प्रवासात पाहू नका अश्लील चित्रपट; रेल्वेची प्रवाशांना महत्त्वाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:34 PM2023-04-15T16:34:09+5:302023-04-15T16:40:00+5:30
या कंपनीद्वारे आपल्या अधिकारात येत असलेल्या रेल्वे स्थानकांवर वायफाय पोहोचवण्याचं काम केलं जातं
ब्रिटनमध्ये एका रेल्वे कंपनीने प्रवाशांना रेल्वे प्रवासात अश्लील चित्रपट पाहण्यास मनाई केली आहे. या घटनेवरुन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. जर प्रवाशांना तसं काही पाहायचं असेल तर प्रवाशांनी घरी पोहोचल्यानंतर आपली प्रायव्हसी जपत ती गोष्ट पाहावी. नॉदर्न रेल असं या कंपनीचं नाव असून कंपनीने फ्रेंडली Wi FI नावाच्या एका कंपनीसोबत टायअप केलं आहे.
या कंपनीद्वारे आपल्या अधिकारात येत असलेल्या रेल्वे स्थानकांवर वायफाय पोहोचवण्याचं काम केलं जातं. या कंपनीने प्रवाशांना सूचना केलीय की, प्रवासादरम्यान मोबाईल किंवा लॅपटॉवर अश्लील चित्रपट पाहू नये. तसेच, वादग्रस्त भडकाऊ मुद्द्यांवर चर्चा नको आणि आपत्तीजनक जोक्सही सार्वजनिकरित्या सांगू नयेत, असे नियमचं कंपनीने प्रवाशांना घालून दिले आहेत. एकूणच प्रवासातील इतर प्रवाशांना लज्जास्पद वाटेल असा कुठलाही कंटेट प्रवासादरम्यान ओपन करू नये, अशी सूचना कंपनीने केली आहे.
याप्रकरणी नॉर्दर्न रेल्वेच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेशिया विलियम्स (Tricia Williams) यांनी म्हटले की, दरवर्षी लाखों प्रवाशी आमच्या ट्रेनमधून प्रवास करतात. या सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रकारची इंटरनेट सेवा, वायफाच्या माध्यमातून पुरवणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, आपण पाहात असलेला किंवा ऐकत असलेला प्रत्येक कंटेंट हा सार्वजनिकपणे वापरता येणारा नसतो. विशेषत: लहान मुलांसाठी हा कंटेंट आमच्या कार्यक्षेत्रात वापरणे योग्य नाही. त्यामुळे, प्रवाशांनी तसा कंटेंट पाहाण्यासाठी आपल्या घरी गेल्यानंतरच वापर करावा.
दरम्यान, कंपनीकडून प्रवाशांना कमीत कमी फिल्टर लावून इंटरनेट वायफाय सेवा पुरवली जाते. याचाच गैरफायदा घेऊन प्रवाशी रेल्वेमध्ये अश्लील कंटेंट पाहणी करतात. जो कंटेंट महिला आणि लहान मुलांसाठी असहजपूर्ण असतो. त्यामुळेच, सर्व प्रवाशांना या सूचना द्यावा लागत आहेत, असे कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.