जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्षाबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 11:01 AM2018-08-06T11:01:39+5:302018-08-06T11:07:36+5:30
हे राष्ट्राध्यक्ष आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करुन टाकायचे.
माँटेव्हिडिओ- साधी राहणी उच्च विचारसरणी अशी जडजड वाक्यं फेकून जगभरातील नेतेमंडळी आपण किती साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या नेत्याला रांगेत उभं राहावं लागलं किंवा एखाद्या नेत्याने स्वतः गाडी चालवली तर भारतीयांना ते आश्चर्य वाटतं. पण आपल्या जगात एका देशाचे राष्ट्राध्यक्ष खरोखर अत्यंत साधे जीवन जगायचे त्यांच्या देशाचा कारभारही चांगल्या पद्धतीने चालवत असत. 2015 साली राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतरही त्यांच्या साधेपणात काही कमी झालेले नाही. विशेष म्हणजे त्यांच्या वागण्यात कोठेही तुम्ही सर्वांनी माझ्याप्रमाणे साधेपणानेच वागलं पाहिजे असा आग्रह नसून 'हा मी निवडलेला पर्याय आहे 'असा भाव असतो.
हे आहेत उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष जोस म्युजिका. जोस वर्षाला केवळ १२ हजार डॉलर इतके वेतन घ्यायचे आणि त्यातील ९०% रक्कम दान देऊन टाकायचे. उरुग्वेचे ते ४० वे अध्यक्ष होते. जोस हे कधीही राष्ट्रपती भवनामध्ये राहिले नाहीत. पत्नीबरोबर ते एका अत्यंत साध्या फार्महाऊससारख्या घरात राहायचे. ते कोणत्याही प्रकारचा मोटारींचा ताफा वापरत नसत. एका पिटुकल्या गाडीमधूनच ते प्रवास करुन आपली कामे व जबाबदाऱ्या पार पाडत. ही गाडी १९८७ साली तयार केलेली असून जोस स्वतःच ती चालवतात.
जोस पती पत्नी यांची एकत्रित संपत्ती केवळ २ लाख १५ हजार डॉलर इतकी आहे. जोस यांंच्या मते ते गरिब नाहीत. जे लोक महागडी जीवनशैली मिळवण्यासाठी पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत स्वतःला अडकवतात ते गरिब असं त्यांचं मत आहे. पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कामं एकाचवेळी करत राहिल्यामुळे स्वतःसाठी फारच कमी वेळ मिळतो. मी पत्करलेला मार्ग यातून स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे असे जोस म्हणतात.