तुम्हाला माहित आहे का ? या देशाने पहिल्यांदा महिलांना दिला मतदानाचा अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 07:33 PM2017-09-19T19:33:16+5:302017-09-19T19:41:21+5:30
न्यूझीलंड हा जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश. आपण या देशाला ओळखतो ते क्रिकेटमुळे.
नवी दिल्ली, दि. 19 - न्यूझीलंड हा जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश. आपण या देशाला ओळखतो ते क्रिकेटमुळे. पण क्रिकेटव्यतिरिक्त सामाजिक सुधारणांच्या बाबतीत न्यूझीलंड एक पुढारलेला देश आहे. जगातल्या काही देशांमध्ये अलीकडच्या काहीवर्षात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश आहे. 19 सप्टेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
राज्यपाल लॉर्ड ग्लासगो यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देणा-या विधेयकावर स्वाक्षरी केली. महिलांना हा अधिकार देण्यापूर्वी न्यूझीलंडमध्ये मोठया प्रमाणावर चर्चा, मंथन झाले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर 1893 मध्ये राष्ट्रीय निवडणुकीत न्यूझीलंडमधल्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अमेरिका हा जगातील सर्वात प्रगत देश. अमेरिकेने 1920 साली महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
जगावर राज्य करणा-या इंग्लंडमध्ये 1928 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी 1950 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तेल संपन्न सौदी अरेबियामध्ये दोनवर्षांपूर्वी 2015 मध्ये महिलांनी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले.
इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ ही या देशाची प्रमुख
न्यूझीलंड हा अगदी पिटुकला देश. लोकसंख्या आहे ४६,०४,८७१. न्यूझीलंडच्या नागरिकांना तसेच ‘पीआर’ म्हणजे पर्मनंट रेसिडेंट असलेल्या व १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीला मतदान करता येते. मतदान करणे सक्तीचे नसले तरी २०१४च्या निवडणुकीत ९२.६टक्के लोकांनी नाव नोंदणी केली व त्यापैकी ७७.९ टक्के लोकांनी मतदान केले होते. निवडणुका दर तीन वर्षांनी होतात.
न्यूझीलंड सरकार हे फक्त ‘हाउस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज’ या एकाच चेंबरचे बनलेले असून, त्यात १२० मेंबर आॅफ पार्लमेंट असतात. या देशाची घटना अलिखित असून, न्यूझीलंडची राणी म्हणजे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) ही या देशाची प्रमुख आहे. देशासंबंधीचे सर्व अधिकार राणीच्या वतीने गव्हर्नर जनरलला असतात.
प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतात - एक राजकीय पक्षाला व दुसरे स्थानिक उमेदवाराला. राजकीय पक्षाला एकूण मतांपैकी किती टक्के मते मिळाली त्या प्रमाणात १२० पैकी जागा मिळतात. उदा. एखाद्या राजकीय पक्षाला ३० टक्के मते मिळाली तर एकूण १२०पैकी ३६ जागा त्यांना मिळतील.