सोशल मीडियावर बातम्या वाचता?- तर ‘हे’ वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:05 AM2021-02-25T00:05:45+5:302021-02-25T00:06:13+5:30
भारतीय उपखंडात जाऊच द्या, पण अमेरिकेत जिथं डिजिटल न्यूज कन्झप्शन जगात सर्वाधिक आहे.
वृत्तपत्र वाचायची काय गरज? आम्ही तर टीव्हीवरच्या बातम्याही पाहणं कधीचंच बंद केलं आहे. सोशल मीडियात सगळ्या बातम्या कळतातच, तिथंच वाचतो - पाहतो त्या बातम्या, बाकी गरजच काय पेपर वाचण्याची..?- असं अनेक जण हल्ली व्हॉट्सपिय किंवा फेसबुकीय चर्चेत बोलत असतात. आपण सर्व बातम्या समाज माध्यमातच वाचतो, तिथलेच व्हिडिओ पाहतो. त्यामुळे आपण जास्त अपडेट असतो असं अनेकांचं ठाम मत दिसतं. मात्र तसं खरंच असतं का?
भारतीय उपखंडात जाऊच द्या, पण अमेरिकेत जिथं डिजिटल न्यूज कन्झप्शन जगात सर्वाधिक आहे, असं मानलं जातं तिथं नक्की काय चित्र आहे? याचाच अभ्यास अलीकडेच अमेरिकेतल्या ‘द प्यू रिसर्च सेंटर’ने केला. त्यांचा अहवाल असं सांगतो की, ज्या लोकांचा बातम्या वाचण्या अगर पाहण्याचा मुख्य स्रोत समाज माध्यमंच असतात, ते लोक अवतीभोवती चालणाऱ्या अनेक सामाजिक मुद्द्यांबदल अनभिज्ञ तरी असतात किंवा खोट्या बातम्या, अफवा, फेक न्यूजला बळी पडतात. मुख्य म्हणजे अवतीभोवतीच्या ज्वलंत सामाजिक मुद्द्यांबाबत त्यांना फार कमी माहिती असते. आताच्या काळात विचार केला तर राजकारण आणि कोरोना या दोन विषयांत सर्वाधिक बातम्या समाजमाध्यमांतच वाचणाऱ्यांना या दोन विषयांची अपुरी माहिती असल्याचं दिसतं.
पारंपरिक वृत्तमाध्यमांपेक्षा बहुसंख्य लोक डिजिटल वृत्तमाध्यमांचा बातम्या वाचणं, माहिती मिळवणं यासाठी जास्त वापर करतात. मात्र तिथं ते ज्या बातम्या आपण वाचल्या असं समजतात, जो विषय आपल्याला कळला आहे असं समजून मतं बनवतात वा व्यक्त करतात, तसा तो विषय त्यांना पुरेशा माहितीच्या आधारे समजलेला असतो का? तर या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारात्मकच येतं!
या अभ्यासासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सहभागी १८ टक्के लोक म्हणतात की, नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसंदर्भातल्या सर्व राजकीय बातम्या त्यांनी केवळ समाजमाध्यमातच वाचलेल्या होत्या. आपण बारीकसारीक तपशील, बातम्याही वाचलेल्या होत्या, असं त्यांचं म्हणणं होतं. प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात त्यांना जे ‘फॅक्ट चेक’ प्रश्न विचारण्यात आले तिथं मात्र त्यांची गल्लत झाली. वृत्तपत्रं वाचणाऱ्या, वृत्तविषयक वेबसाइट्स किंवा वृत्तवाहिन्या पाहणाऱ्या लोकांनी ज्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहजी दिली, त्याच प्रश्नांची उत्तरं केवळ समाजमाध्यमातून माहिती घेणाऱ्यांना देता आली नाहीत. अनेक फेक न्यूज खऱ्याच आहेत, समाजमाध्यमात व्हायरल झालेली माहितीही सत्यच आहे, असं वाटणाऱ्यांमध्ये या लोकांचं प्रमाण जास्त होतं.
विशेषत: कोरोनाच्या संदर्भात मिळणारी माहिती, उठणाऱ्या वावड्या, उपाय, त्यासाठी घ्यायची औषधं हे सारं केवळ समाजमाध्यमांवर अवलंबून असणाऱ्यांना इतरांपेक्षा जास्त पटीत माहिती होतं हे खरंच. मात्र त्यांनी ती माहितीची सत्यासत्यता कुठंही पडताळून पाहिलेली नव्हती. व्हिटॅमिन सी घेतलं, तर कोरोना संसर्गाचा धोका टळतो, असं अमेरिकन समाजमाध्यमात व्हायरल झालं होतं! अशा प्रकारची चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती कोरोनाकाळात समाजमाध्यम वापरकर्त्यांना जास्त मिळाली; आणि त्याहून वाईट हे की ती सारी माहिती खरीच आहे, असं ते समजत होते.
जे कोरोनाच्या बाबतीत तेच निवडणुकीत! कोण काय म्हणालं, राज्यागणिक कुणाला किती मतं पडली यापासून ते अमेरिकन बेरोजगारीचे दावे, राजकीय नेत्यांनी दिलेली माहिती या साऱ्यात ‘फॅक्ट्स’ आणि समाजमाध्यमातली माहिती यात काही ताळमेळच नव्हता, असं या अभ्यासात दिसलं.
नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात साधारण ९ हजार अमेरिकन व्यक्तींशी बोलून हा अभ्यास करण्यात आला. त्यातल्या त्यात तुम्हाला कोणतं समाजमाध्यम कमी भरवशाचं वाटतं, यावर सर्वांत कमी विश्वास फेसबूकवर असल्याचं अनेक जण सांगतात. डाव्या अगर उजव्या विचारांची मुखपत्रंही योग्य माहिती घेण्यासाठी म्हणून अमेरिकन लोक वाचताना दिसत नाहीत. हा अभ्यास जरी आता प्रसिद्ध झालेला असला तरी काही महिन्यांपूर्वी ‘फोर्ब्ज’ या मासिकाने सोशल मीडिया युजर्स फेक न्यूजला जास्त प्रमाणात बळी पडतात अशी मांडणी करणारा एक दीर्घ लेख प्रसिद्ध केला होता.
कोरोनाच्या काळात तर शास्त्रीय माहिती म्हणून अनेक गोष्टी समाजमाध्यमात फिरल्या. अमूक फळ खा, तमूक भाज्या खा, तमूक करून वजन कमी करा, इथपासून ते व्हिटॅमिन डी आणि सी साठीचे अनेक तपशील व्हायरल झाले. त्यातून अनेकांच्या मनात भ्रम निर्माण झाला. साथीच्या काळात हातात संपर्क आणि माहिती साधनं असूनही योग्य माहिती लोकांपर्यंत दुर्दैवाने पोहोचली नाही.